कोल्हापूर,दि.6: काँग्रेस नेते लोकसभा विरोधीपक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शनिवारी (दि.5) कोल्हापूर येथे संविधान सन्मान संमेलनात ‘जगातील कोणतीही शक्ती जात गणनेला रोखू शकत नाही’ असे वक्तव्य केले. आरक्षणावरील 50 टक्क्यांच्या मर्यादेला ‘कृत्रिम अडथळा’ म्हणून राहुल यांनी संबोधले आणि म्हटले की जगातील कोणतीही शक्ती काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला जात-आधारित गणनेवरील विद्यमान बंदी उठवण्यापासून आणि आरक्षण मर्यादा वाढवण्यापासून रोखू शकत नाही.
लिहून द्यायला तयार
पंतप्रधान मोदी काहीही करू देत, ते कितीही डान्स-गाणी करू देत. भाजपवाले कितीही नाचू देत 50 टक्के आरक्षण मर्यादेची भिंत आम्ही तोडणारच. जातनिहाय जनगणनेचा कायदा आम्ही लोकसभा व राज्यसभेत करणार आहे. जगातील कोणतीही शक्ती त्यापासून आम्हाला रोखू शकत नाही. हा आमचा शब्द आहे आणि हवे तर तो मी तुम्हाला लिहून द्यायला तयार आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
मी जे म्हणतो त्याचा अर्थ जगातील कोणतीही शक्ती आपल्याला लोकांना त्यांचे हक्क देण्यापासून रोखू शकत नाही. आरएसएस आम्हाला रोखू शकत नाही. भाजप आम्हाला रोखू शकत नाही. लोकसभा आणि राज्यसभेतील आरक्षणावरील 50 टक्के मर्यादा हटवण्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला रोखू शकत नाहीत. असेही ते यावेळी म्हणाले.
आज अदानी, अंबानींच्या मॅनेजमेंटमधील यादी बघितली तर दलित, आदिवासी, ओबीसी हा वर्ग कुठे आहे? त्यांचे उत्पन्न किती आहे? असा सवाल करीत राहुल गांधी म्हणाले, दलित, मागास, वंचित वर्गातील लोकांना उद्योग, व्यवसाय, शिक्षण, न्यायालयासह कुठेही फारशी संधी दिली जात नाही. सरकारी पाठोपाठ खासगी संस्थांमध्ये खासगीकरणामुळे आरक्षण संपवले जात आहे. असे राहुल गांधी म्हणाले.