मुंबई,दि.24: राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने इशारा दिला आहे. परतीच्या पावसाचा जोर आता आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागात येत्या 24 तासात कमी दाबाचा पट्टा तयार होणार असल्याने परतीच्या पावसाचा जोर वाढणार आहे. मॉन्सूनने आता राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू केला असून त्याचा परतीचा प्रवास कच्छपर्यंत आला आहे. बंगालच्या उपसागारातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात येत्या 3 ते 4 दिवसात पावसाचा जोर वाढणार आहे.
राज्यात पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.
या जिल्ह्यांना पावसाचा इशारा
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा 24 तासांत तयार होत असल्याने राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र या भागातपुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता व्रतवण्यात आली आहे. मुंबई आणि कोकणातही पाऊस हजेरी लावणार आहे. सोलापूर, पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.