सिंधुदुर्ग,दि.26: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला आहे. ही घटना दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेची माहिती मिळताच शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली. तहसीलदार, पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे मात्र स्पष्ट झालेलं नाही.
नौदल दिननिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2023ला मालवणमध्ये येऊन या पुतळ्याचं लोकार्पण केलं होतं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भग्न पुतळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून शिवप्रेमींनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामात, आणि तो पुतळा बसवण्यात जो काही हलगर्जी पणा झाला असेल, या सगळ्या कामात भ्रष्टाचार झाला आहे का याची चौकशी करण्यासााठी राज्य सरकारने समिती नेमली पाहीजे, अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. अनथ्या आम्ही तीव्र आंदोलन करु असा इशाराही वैभव नाईक यांनी दिला आहे.
दरम्यान, भाजपाच्या नेत्यांनी सातत्याने राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला आणि मते घेतली, पण नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे. निकृष्ट बांधकामामुळे राजकोट किनाऱ्यावरील पुतळा कोसळला आहे. महाराजांच्या पुतळ्याच्या कामातही भ्रष्टाचार करणाऱ्या या लोकांना महाराष्ट्राची जनता कदापी माफ करणार नाही, असं काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे.








