मुंबई,दि.21: राष्ट्रवादीचे नेते राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर आरोपांची मालिका सुरू केली आहे. समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा दावा यापूर्वीच नवाब मलिक यांनी केला होता. नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक खान (Nilofer Malik Khan) यांनीही समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करत मोठा पुरावाच सादर केला आहे.
निलोफर मलिक यांनी एक ट्वीट करून धुरळा उडवून दिला आहे. निलोफर यांनी समीर वानखेडे यांच्या निकाहाची पत्रिकाच समोर आणली आहे. 2006 मध्ये समीर वानखेडे यांचं डॉ शबाना कुरेशी यांच्याशी निकाह झाला होता. त्याच निकाहाची पत्रिका निलोफर यांनी समोर आणली आहे.
निलोफर मलिक यांनी शेअर केलेल्या पत्रिकेत समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव हे दाऊद म्हणून लिहिलेले आहे. याआधीही नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या लग्नाचे पहिले फोटो प्रसिद्ध केले होते. त्यावरूनही मोठा वाद निर्माण झाला होता. वानखेडे कुटुंबीयांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते. पण, मलिक यांनी एकापाठोपाठ पुरावे देत समीर वानखेडे हे मुस्लिमच होते, असा दावा केला आहे. याच मुद्यावरून समीर वानखेडे यांचं जात प्रमाणपत्र खरं आहे की खोटं आहे, याची तपासणी जात पडताळणी आयोगाकडे सुरू आहे.