हिंगोली,दि.7: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. मराठा आरक्षण 13 जुलैपर्यंत मिळालेच पाहिजे. महाराष्ट्र म्हणजे छगन भुजबळांची मक्तेदारी नाही. भुजबळांचे ऐकून निर्णय घेण्यास चालढकल करणार असाल तर त्याचे परिणाम सरकारला झेपणार नाहीत. मराठय़ांच्या नादी लागाल तर ‘कार्यक्रम’ करेन, असा दम मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला भरला.
हिंगोलीत शनिवारी मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत सहभागी होण्यासाठी जिल्हाभरातून लाखो मराठा समाजबांधव आले होते. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली. 13 जुलैपर्यंतची मुदत सरकारने मागून घेतली आहे. आरक्षण, सगेसोयऱ्यांचा अध्यादेश ही सरकारचीच जबाबदारी आहे. मराठा आणि कुणबी एकच आहेत. त्यामुळे आम्हाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीचा जरांगे यांनी पुनरुच्चार केला.
आमचा जोर कुठेच कमी झालेला नाही. आम्हाला आरक्षण द्या. आमच्यावर अन्याय करू नका. आम्ही एकटेच 50 ते 55 टक्के आहोत. कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाही. आम्ही संयम ठेवत आहोत. आमचा नाइलाज होऊ देऊ नका, असा निर्वाणीचा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिला आहे.
एकही उमेदवार
भुजबळांचे ऐकून मराठ्यांचे नुकसान करू नका, नाही तर या सरकारला जड जाईल. मराठ्यांवर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर 288 पैकी एकही उमेदवार सरकारचा निवडून येऊ देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी यावेळी दिला.
रॅलीत सहभागी होणाऱ्या मराठा बांधवांची असुविधा होऊ नये यासाठी खास 1200 पुरुष आणि 200 महिला स्वयंसेविकांचे पथक तैनात होते. रॅलीच्या मार्गावर सात ठिकाणी आरोग्य पथकेही सज्ज ठेवण्यात आली होती. रॅलीत सहभागी समाजबांधवांना वेळोवेळी ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना देण्यात येत होत्या. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. रॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.