“भाजपविरुद्ध कोणी लढू शकणार नाहीत, हे अजिंक्य आहे असे…” उध्दव ठाकरे

0

मुंबई,दि.15: महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला यश मिळाले. तर महायुतीला मोठा फटका बसला आहे. संपूर्ण देशात भाजपविरुद्ध कोणी लढू शकणार नाहीत, हे अजिंक्य आहे असे वातावरण होते. पण या अजिंक्य असण्यातला फोलपणा महाराष्ट्राच्या जनतेने ताकदीने दाखवून दिला. ही लढाई फार विचित्र होती. आर्थिक आणि यंत्रणेच्या दृष्टीनेही ही लढाई विषम होती. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई होती. देशभक्त आणि लोकशाहीप्रेमी नागरिकांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीला आणि देशात इंडिया आघाडीला कौल दिला. आता या देशाला जाग आली आहे. पण हा विजय अंतिम नाही, लढाई आता सुरू झाली आहे, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी विधानसभा निवडणूकही एकजुटीने लढेल अशी घोषणा केली.

यांचे मानले आभार

लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर आता आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन महाविकास आघाडीची शनिवारी दुपारी संयुक्त पत्रकार परिषद झाली. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल देणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेचे उद्धव ठाकरे यांनी आभार मानले. तसेच ‘निर्भय बनो’ ही सामाजिक संघटना, यूट्युबच्या माध्यमातून हेमंत देसाई, प्रशांत कदम, निखील वागळे, अशोकराव वानखेडे, रवीश कुमार या सगळ्यांनी धाडसाने जनतेचे प्रश्न मांडले. त्यांच्या त्या निष्पक्षपातीपणे जनतेची बाजू मांडण्यामुळे जनतेलाही सत्य काय आहे ते कळत गेले, असे म्हणत या सगळ्यांचे कौतुकही उद्धव ठाकरे यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई आदी उपस्थित होते.

वंचिताला सोबत घेणार का?

राज्यात विधानसभा निवडणुकीत वंचिताला सोबत घेणार का असा प्रश्न विचारल्यानंतर उध्दव ठाकरे म्हणाले, “काही लोक आमच्यासोबत होते. त्यांना घेऊन पुढे जाऊ. कुणी जर आमच्यासोबत येत असतील. कोणतीही अट आणि ओढताण न करता येत असतील तर त्यांनी यावं, असा स्पष्ट संदेश उद्धव ठाकरे यांनी दिला. त्यामुळे वंचिताला महाविकास आघाडीची दारं सताड उघडी असली तरी त्यांना अटी आणि शर्तीवर आघाडीत येता येणार नाही, असा संदेश त्यांनी दिला आहे. तुम्ही जे नाव घेतलं. मी त्यावर बोलत नाही. मी जनरल बोलतो.”

विधानसभा निवडणूकही एकत्र लढणार

लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभाही एकत्र लढणार का? या प्रश्नाचे उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जेव्हा तीन पक्ष एकत्रित पत्रकार परिषद घेतात तेव्हा साहजिकच त्याच्या आधी एक संयुक्त प्राथमिक बैठक झालेली असते. येत्या विधानसभेतही जे घटकपक्ष आणि सामाजिक संघटना सुद्धा आमच्या सोबत आहेत, त्यांना बरोबर घेऊन आम्ही लढणार आहोत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here