मुंबई,दि.11: राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मोठं विधान केलं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) 8 जण विजयी झाले तर अजित पवार गट फक्त 1 जागेवर विजयी झाला. अमोल मिटकरी यांनी ‘बीडच्या बप्पाचा दादांना फोन’ असं ट्वीट केल्याने खळबळ माजली आहे. खासदार बजरंग सोनावणे हे शरद पवार गटाचे आहेत. ZEE 24 तासने याबाबत वृत्त दिले आहे.
बजरंग सोनावणे यांनी बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा पराभव करत विजय संपादन केला. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सोनावणे हे शरद पवार गटात सहभागी झाले. सोनावणे यांनी अजित पवारांशी संवाद साधल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे. यासंबंधी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सविस्तर माहितीही दिली आहे.
तुतारीचे खासदार सांभाळून ठेवावेत | Amol Mitkari
“काल ज्यांनी विजयोत्सव साजरा केला त्यांच्यातील काहीजण जेव्हा आमचं भविष्य कसं अशी गळ घालतात तेव्हा माझ्याारख्या कार्यकर्त्याला अभिमान वाटतो. मी त्या नेत्यासोबत काम करत आहे जे नेते महाराष्ट्रात सर्वसमावेशक भूमिका घेऊन तळागळातील लोकांचं काम करतात. आज सकाळी 7.30 ला फोन आला होता. हा फक्त ट्रेलर आहे. तेथील तथाकथित नेत्याने दादा गटातील काही नेते आमच्या गटात येतील अशी भविष्यवाणी केली होती. पण त्यांनी तुतारीचे खासदार सांभाळून ठेवावेत,” असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला आहे. सध्या एक तरी गळाला लागल्यासारखा दिसत आहे. लवकरच मोठा पिक्चर दिसेल असा दावाही त्यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले की, “दादांच्या कामाबाद्दल कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही. बारामतीच्या विकासात साहेबांप्रमाणे अजितदादांचाही वाटा आहे. ही निवडणूक विकासापेक्षा भावनिकतेवर गेली त्यामुळे पराभव स्विकारावा लागला. आमच्यासाठी हे अनपेक्षित होतं. पण आम्ही हिरीरीने काम करणार आहोत. पण अजित पवार राज्यात केंद्रस्थानी असणारे किती महत्वाचे नेते आहेत हे सिद्ध होत आहे. एखाद्याच्या साखर कारखान्याच्या मजुराचा प्रश्न असले आणि तो दुसऱ्या गटाचा खासदार अजित पवारांना फोन करुन विनंती करत असेल तर आमच्यासाठी भूषणाह बाब आहे”.