मोहोळ,दि.१७: नुकत्याच स्थापन झालेल्या अनगर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी म्हणून चरण कोल्हे तर प्रशासक म्हणून तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांनी पदभार स्वीकारला. पदाची सूत्रे हातात घेतल्यावर माजी आमदार राजन पाटील यांच्या हस्ते नूतन मुख्याधिकारी व प्रशासक यांचा सत्कार करण्यात आला.
मोहोळ तालुक्यातील अनगर (कोंबडवाडी) या ग्रामपंचायत सह खंडोबाचीवाडी, नालबंदवाडी, व कुरणवाडी (अ) या ग्रामपंचायतीचे अनगर नगरपंचायत मध्ये रूपांतर करणेसंबंधीचा शासनादेश दि. १ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला होता. तर पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर नगर विकास प्रशासनामार्फत जिल्हा वार्षिक व नियोजन समितीच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या अनेक नगरोत्थान योजनेतून तातडीने एक कोटी रुपयांचे अनुदानरूपी निधीही देण्यात आला होता. यानुसार दि.१६ नोव्हेंबर रोजी माढा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चरण कोल्हे यांनी अनगर नगरपंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी म्हणून तर प्रशासक म्हणून मोहोळचे तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांनी पदभार स्वीकारला. दरम्यान नगर पंचायतीच्या माध्यमातून अनगर सह चार गावातील वाड्या-वस्त्या वरील रस्ते यासह नागरिकांच्या मुलभूत गरजांना गती येणारे काम संबंधित अधिकाऱ्यांकडून पूर्ण होईल, असा आशावाद असल्याचे माजी आमदार राजन पाटील यांनी सांगून नूतन मुख्याधिकारी कोल्हे व प्रशासक बेडसे पाटील यांचा सत्कार माजी आमदार राजन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी ग्राम विकास अधिकारी सचिन कदम, तलाठी नामदेव रेळेकर, ग्रामसेवक कैलास मोरे, ग्रामसेवक मनीषा देवकर, मंजुश्री कारंडे, शहाजी गुंड, राम कदम, नारायण गुंड, रवी पाचपुंड, पांडुरंग थीटे, बंडू शेख, महादेव राऊत, शंकर गुंड, भाऊराव इंगळे, राम शिंदे, आगतराव गुंड, किसन गुंड, भारत जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.