राहुल गांधींची चायनीज गॅरंटी आणि मोदीजींची भारतीय गॅरंटी याचीच ही निवडणूक

0

सांगली,दि.4: या निवडणुकीत एक गट राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचा आहे, तर दुसरा गट राम मंदिर बनविणारा आहे. एका बाजूस व्होट जिहाद पुकारणारे लोक आहेत, तर दुसरी बाजू व्होट फॉर विकास मानणारे आहेत. एका बाजूला परिवाराचा विकास करणारे लोक, तर दुसऱ्या बाजूला मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास करणारे लोक आहेत. एका बाजूस राहुल गांधींची चायनीज गॅरंटी आहे, तर दुसरीकडे मोदीजींची भारतीय गॅरंटी आहे. ही निवडणूक अशा दोन बाजूंमधील निवडणूक आहे, अशा शब्दांत विरोधकांवर हल्ला चढवत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगलीतील सभा गाजविली.

कृषी आणि सहकारमंत्री असताना शरद पवार यांनी काय केले, राज्यातील 101 सहकारी साखर कारखाने कोणामुळे बंद झाले, जिल्हा बँकांवर प्रशासक कोणामुळे आले, याचा खुलासा करा, असे आव्हानही शाह यांनी शरद पवार यांना दिले. 

सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपा-महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचार सभेत बोलताना शाह यांनी मोदी सरकारच्या कामांची संपूर्ण माहिती मांडली. या सभेला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर आदी उपस्थित होते.

कोविडसारख्या महामारीच्या काळात कोविडची लस देऊन देशाला वाचविण्याचे काम मोदी यांनी केले. राहुल गांधी अगोदर लसीकरणास विरोध करत होते, पण संपूर्ण देश लस घेत असल्याचे दिसताच एका रात्री गुपचूप राहुल गांधी यांनीही लस घेतली, अशा शब्दांत त्यांनी राहुल गांधींचा समाचार घेतला.

जे रामाच्या प्रतिष्ठापनेसोबत नाहीत, त्यांच्यासोबत…

मोदी जे बोलतात ते करून दाखवितात. अयोध्येत भव्य राम मंदिर बनविणार अशी ग्वाही भाजपाने दिली होती. काँग्रेसने सत्तर वर्षे राम मंदिराचा प्रश्न रखडविला. मोदीजींनी पाच वर्षांत मंदिर बनविले, प्रभू रामचंद्रांची प्रतिष्ठापना केली आणि पाचशे वर्षांची देशाची प्रतीक्षा पूर्ण केली. शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, प्रियंका गांधींनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कार टाकला. जे रामाच्या प्रतिष्ठापनेसोबत नाहीत त्यांच्यासोबत देशातील जनता असणार नाही, असेही शाह म्हणाले.     

महिलांसाठी लोकसभा, विधानसभेत 33 टक्के आरक्षण देऊन मातृशक्तीच्या सक्षमीकरणाचे ऐतिहासिक काम मोदी यांनी केले. तिहेरी तलाक रद्द करण्याचे काम मोदी यांनी केले. पीएफआयवर बंदी मोदींनी आणली, असे सांगत शाह यांनी मोदी सरकारच्या कामांची यादीच सादर केली. आशिया खंडातील सर्वात मोठा साखर कारखाना कोणामुळे बंद झाला याचे उत्तर शरद पवार यांनी दिले पाहिजे, असे सांगत शाह यांनी शरद पवार यांनाही लक्ष्य केले.

टेंभू सिंचन योजनेचे 1998 मध्ये सुरू झाले, पण 2014 पर्यंत काहीच झाले नाही. 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेवर येताच काम सुरू झाले, म्हैसाळ सिंचन योजनेमुळे 65 हजार हेक्टर जमीन ओलीताखाली आली. आज महाराष्ट्रात 202 पैकी 101 साखर कारखाने बंद कसे झाले, दहा वर्षे कृषी आणि सहकार मंत्री असताना तुम्ही काय केले, राज्यातील 34 जिल्हा बँकांपैकी तीन चार बँका वगळता बाकी सर्व बँकांवर प्रशासक कोणाच्या चुकीमुळे आले, याची उत्तरे शरद पवार यांनी द्यावीत, असे आव्हानही शाह यांनी दिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here