सोलापूर,दि.3: मुस्लिमांच्याबाबतीत भाजप आणि काँग्रेस यांची भूमिका सारखीच असून भाजपची हार-जीत ही मुस्लिम समाजाच्याच हाती आहे. त्यामुळे या निवडणुकीत मुस्लिम समाजाने वंचित बहुजन आघाडीला निवडून द्यावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
गुरूवारी (दि.3) भवानी पेठ येथील जय भवानी प्रशालेच्या मैदानावर सोलापूर लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार अतिश बनसोडे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सेभेत ॲड. आंबेडकर बोलत होते.
यावेळी त्यांनी भाजपसह काँग्रेसवर टीकेची झोड उठवत या दोन्ही पक्षांची मुस्लिमांच्या बाबतीत सारखीच भूमिका असल्याचे नमूद केले. याप्रसंगी वंचितचे राज्य उपाध्यक्ष अनिल जाधव, सोलापूर जिल्हा प्रभारी प्रा. सोमनाथ साळुंखे, डॉ. क्रांती सावंत, पुरस्कृत उमेदवार अतिश बनसोडे, युवक अध्यक्ष पांडुरंग खांडेकर, कामगार संघटनेचे अध्यक्ष ज्योतिर्लिंग स्वामी, मुस्लिम आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे यांनी केले.
यावेळी ॲड. आंबेडकर म्हणाले, वंचित आघाडी महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून समोर येत आहे. आज परिस्थिती बदलली आहे. जो भाजपला हरवेल त्याला मतदान करण्याचे आवाहन ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशनने केले आहे. त्यामुळे भाजपला हरविण्य़ासाठी मुस्लिम बांधवांनी वंचित बहुजन आघाडीच्या दुधात साखर म्हणून काम करत आमच्या उमेदवारांना निवडूण द्यावे. धर्मनिरपेक्ष आणि मुस्लिमांच्या मतावरच आम्ही निवडूण येणार आहोत.
परंतु मुस्लिम समाजातील मौलवींना समाजात काय चालले आहे, त्याची कल्पना नाही. त्यामुळेच ते काँग्रेसला निवडूण देण्याचे आवाहन करित असून त्यांनी समाजाच्या बाहेर पडून इतर समाजाची काय मानसिकता आहे, ही समजून घेण्याची गरज आहे. तसेच बोफोर्स प्रकरणी काँग्रेसचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर पुरावा नसतानाही आरोप झाले. मात्र, सध्या भाजपच्या कार्यकाळात अनेक प्रकरणाचे पुरावे असतानाही काँग्रेसमध्ये भाजपला अंगावर घेण्याची हिंमत नाही.
या कंपनीने सरकारला कोटींनी पैसे दिले
कोविडच्या काळात जागतिक आरोग्य संघटनेने रेमडिसिवर औषध वापरू नका असे स्पष्ट केले होते. परंतु हे औषध गुजरातमधील कंपनीने बनविले होते. या कंपनीने सरकारला कोटींनी पैसे पुरविल्यानंतर त्यांनी यास परवानगी दिली. याबाबत पुरावेच पुरावे आहेत पण काँग्रेसवाले बोलायला तयार नाहीत. काँग्रेसवाल्यांचे तोंड कोणत्या मशीनने शिवले ते तरी त्यांनी सांगावे, असा सवालही ॲड. आंबेडकर यांनी उपस्थित केला. या सभेस जिल्ह्यातील पदाधिकारी , बहुसंख्य कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.