औरंगाबाद,दि.17: बोगस रुग्णावर (fake patient) कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू असल्याचे व जे कोरोना बाधित आहेत ते बाहेर मोकाट फिरत असल्याची घटना उघडकीस आली आहे. बोगस पोलीस, बोगस डॉक्टर्सला पकडल्याचं तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल पण आता औरंगाबाद (Aurangabad) मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथ कोविड सेंटरमध्ये चक्क बोगस रुग्णांवर (bogus covid patient) उपचार सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण (Covid positive) मोकाट फिरत असून त्यांच्याऐवजी बोगस रुग्णालयात उपचार सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय.
बोगस कोरोना बाधित रुग्णांना कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होण्यासाठी 10 हजार रुपये दिले जात असल्याची माहितीही समोर आली आहे. औरंगाबाद महापालिकेच्या मेलट्रॉन कोविड रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर औरंगाबाद महानगरपालिकेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. बोगस रुग्ण, तसेच पॉझिटिव्ह आलेल्या संबंधित रुग्णांच्या विरोधात मनपाकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, औरंगाबादमधील एका उद्यानाच्या बाहेर कोरोनाची अँटीजेन टेस्ट केली असताना दोन रुग्ण कोविड पॉझिटिव्ह असल्याचं कळालं. यानंतर या दोन्ही तरुणांनी आपल्या ऐवजी इतर दोन तरुणांना कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. काम लावतो म्हणून जालना येथून आणलेल्या तरुणांना बोगस रुग्ण बनवत त्यांना रुग्णालयात दाखल केले.
ज्यावेळी या तरुणांच्या लक्षात आले की, आपल्याला कोविड रुग्ण म्हणून दाखल करुन उपचार सुरू केले आहेत त्यावेळी त्यांचाही गोंधळ उडाला. त्यानंतर त्यांनी कोविड सेंटरमध्ये गोंधळ घालत सुटका करण्याची मागणी केली. यानंतर रुग्णालय प्रशासनाच्याही हा प्रकार लक्षात आला.
त्यानंतर संबंधित दोन्ही तरुणांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, रुग्णालयात दाखल होण्यासाठी आपल्याला 10 दिवसांसाठी 10 हजार रुपये देण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं. बोगस रुग्णांच्या विरोधात तक्रार दाखळ करण्यात आली आहे. मात्र, खरोखर जे रुग्ण कोविड बाधित आहेत ते मात्र, अद्याप फरार आहेत.
या संपूर्ण प्रकरणी औरंगाबाद महानगरपालिकेकडून रात्री उशिरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल खऱण्यात आली आहे. आता खरे पॉझिटिव्ह रुग्ण शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. दरम्यान या संपूर्ण घटनेने औरंगाबादमध्ये एकच खळबळ उडाली आहे.