नांदेड, अमरावती, मालेगावात घडलेली घटना विचारपूर्वक केलेला प्रयोग : देवेंद्र फडणवीस

0

देशात अराजक निर्माण करण्यासाठी, केंद्र सरकारविरोधात विचारपूर्वक केलेला प्रयोग आहे

मुंबई,दि.16: नांदेड, अमरावती, मालेगावात घडलेली घटना साधी मानू नका. हा एक प्रयोग आहे. देशात अराजक निर्माण करण्यासाठी, केंद्र सरकारविरोधात विचारपूर्वक केलेला प्रयोग आहे असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे. मुंबईत आज भाजप (bjp) कार्यकारिणीची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत. अमरावती, नांदेड आणि मालेगावातील हिंसाचार, राज्यात सामुहिक बलात्काराच्या वाढत्या घटना, दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्या, वसुली आणि भ्रष्टाचाराचे आरोप या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य उरले नाही तर ‘काय द्यायचे’ राज्य सुरु असल्याचा घणाघात त्यांनी केलाय.

26 ऑक्टोबरला बांग्लादेशात हिंदूंवर अत्याचार होतात. त्याचा निषेध म्हणून त्रिपुरात मोर्चा निघतो. 28 ऑक्टोबरला सोशल मीडियावर पोस्ट पसरवल्या जातात. तेव्हा मशिदीचा फोटो टाकला जातो. दिल्लीतील एका रेफ्युजी कँपला लागलेल्या आगीचा फोटो दाखवून त्रिपुरात कुराण जाळण्यात आल्याचं सांगितलं जातं. जुन्या मिरवणुकीचे फोटो दाखवून हिंदू मोठ्या प्रमाणात मुस्लिमांवर अन्याय करत असल्याचा आरोप केला जातो.

दु:खद बाब ही की देशाचे एक मोठे नेते राहुल गांधी यांना सर्व माहिती असूनही 8 नोव्हेंबरला ते ट्विट करतात की, त्रिपुरात खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिमांवर अत्याचार होतोय. लगेच 11 नोव्हेंबरला नांदेड, अमरावती, मालेगावात मुस्लिमांचे मोठे मोर्चे निघतात. एकाच वेळी वेगवेगळ्या शहरात हे कसं घडू शकतं. हे सर्व राज्य सरकारच्या समर्थनातून निघालेले मोर्चे आहेत, असा गंभीर आरोप फडणवीस यांनी केलाय.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here