मुंबई,दि.19: ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपाचे आभार मानत खोचक टोला लगावला आहे. महायुतीत भाजपाकडून नारायण राणे यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर झाली. जोरदार शक्तिप्रदर्शन करत नारायण राणे यांनी उमेदवारी अर्ज भरला. महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाने विनायक राऊत यांना उमेदवारी दिली आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे विरुध्द विनायक राऊत अशी लढत होणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये आम्हाला आमच्याविरोधात नारायण राणे हेच उमेदवार हवे होते. ही आमची विनंती भाजपने मान्य केल्याने आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी खोचक टोला लगावला.
संजय राऊत हे सांगलीतून चंद्रहार पाटील यांनी ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज भरला यावेळी उपस्थित होते. रत्नागिरी-सिंधुदुर्गातून नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यासंदर्भात पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत म्हणाले की, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात विनायक राऊत विरुद्ध नारायण यांच्यात सामना होणारच नाही. तिथे एकतर्फी लढत आहे. कोकणात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये फक्त शिवसेनेच्याच उमेदवाराला लोक मतदान करतात. नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत, आम्हाला त्या मतदारसंघात आमच्यासमोर तेच हवे होते. भाजपाने आमची विनंती मान्य केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.