मुंबई,दि.18: राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं होणारे बदल नवनवीन समस्य़ा निर्माण करताना दिसत आहेत. अरबी समुद्रातील चक्रीवादळाच्या स्थितीमुळे गुजरातकडून कोकण तसेच मध्य महाराष्ट्रात आर्द्रतायुक्त उष्ण वारे येत आहेत. बंगालच्या उपसागरावरून छत्तीसगड तेलंगणामार्गे विदर्भातही आर्द्रतायुक्त उष्ण वारे येत असल्याने शुक्रवारी व शनिवारी राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये राज्याच्या काही भागांमध्ये अवकाळी आणि गारपीटीचा तडाखा बसला आहे. तर, काही भागांमध्ये मात्र उष्णतेच्या लाटांनी नागरिकांना हैराण केलं आहे. पुढील दोन दिवस मराठवाड्यात काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा असतानाच बुधवारी काही भागात पाऊस झाला. बीडमध्ये वीज कोसळून चार जनावरे दगावली. हिंगोलीतही पावसाने हजेरी लावली.
हवामान विभागानं स्पष्ट केलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहील. तर, शहर आणि उपनगरात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. कोंकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.