मुंबई,दि.28: भाजपा नेते मंत्री गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत मोठं वक्तव्य केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवराळ भाषेत टीका केली होती. फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर भाजपा आमदार आक्रमक झाले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. महाजन यांनीही जरांगे पाटील यांना आता माफी नाही असे वक्तव्य केले आहे.
गिरीश महाजन म्हणाले, ‘मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अतिशय संवेदनशील भूमिका घेत महायुती सरकारने श्री. मनोज जरांगे यांना मर्यादेच्या पलीकडे जाऊन सहकार्य केलं, समाजाचे प्रतिनिधी म्हणून त्यांचा सन्मान केला. परंतू समाजाची ढाल करून त्यांनी स्वतःचा स्वार्थी राजकीय अजेंडा रेटला, राज्याच्या नेत्यांना शिवीगाळ केली.’
गिरीश महाजन म्हणाले जरांगे पाटील यांनी कळस गाठत देवेंद्र फडणवीस यांना जातीवाचक शिवीगाळ केली, आई-बहिणीवरून बोलले. पुढे ते म्हणाले, ‘मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणून श्री. मनोज जरांगे यांच्याशी महायुती सरकारच्या वतीने माझ्यासह अनेक सहकाऱ्यांनी अनेकदा संवाद साधला. श्री. मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा आम्ही सातत्याने सन्मानच केला. परंतु मराठा आरक्षण हा सर्वस्वी सामाजिक प्रश्न असताना त्याला नाहक राजकीय वळण देऊन श्री. मनोज जरांगे यांनी स्वतःचेच पितळ उघडे केले आहे. श्री. मनोज जरांगे यांच्या या कृत्याचा मराठा समाजातील अनेक पिढ्या निषेधच करतील.’