मुंबई,दि.24: छत्तीसगडमधील चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेते मनोज राजपूत याला पोलिसांनी लग्नाचे आमिष दाखवून गेल्या 13 वर्षांपासून त्याच्या जवळच्या नात्यातील मुलीवरच बलात्कार केल्याप्रकरणी अटक केली आहे. त्याच्यावर अनैसर्गिक संबंध ठेवल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. 29 वर्षीय पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला दुर्ग जिल्ह्यातील त्याच्या कार्यालयातून अटक केली.
स्टेशन हाऊस ऑफिसर (SHO) राजकुमार बोरझा म्हणाले, “22 फेब्रुवारी रोजी पीडित मुलीने जुनी भिलाई रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली की, मनोज राजपूत 2011 पासून लग्नाच्या बहाण्याने तिचे लैंगिक शोषण करत होता. यादरम्यान त्याने तिच्यासोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवले. मुलीने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकल्यावर त्याने टाळाटाळ सुरु केली. त्यानंतर तिने पोलिसांशी संपर्क साधला.”

एसएचओने सांगितले की, पीडित मुलीच्या तक्रारीच्या आधारे मनोज राजपूत याच्यावर बलात्कार, अनैसर्गिक लैंगिक संबंध, गुन्हेगारी धमकी आणि इतर गुन्ह्यांसह भारतीय दंड संहितेच्या कलमांसह लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . लैंगिक अत्याचाराला सुरुवात झाली तेव्हा पीडित मुलगी अल्पवयीन होती. मात्र, स्थानिक न्यायालयाने POCSO च्या तरतुदी रद्द केल्या आहेत.
पोलीस अटक केल्यानंतर मनोज राजपूतला घेऊन जात असताना त्याने मीडियाला फ्लाइंग किस दिला. आपल्याविरोधात कट रचण्यात आल्याचा आरोप त्याने केला आहे. आपल्याला अडकवलं जात असल्याचं त्याचं म्हणणं आहे. तो म्हणाला की, “राजेश बिहारी नावाची व्यक्ती मुद्दामून शत्रुत्वाखातर हे करत आहे. ज्या मुलीने माझ्याावर आरोप केले आहेत, ती 11 वर्षं कुठे होती. मला अडकवण्याच्या हेतूने हे सर्व केलं जात आहे”.
मनोज राजपूत हे व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक आहेत, परंतु त्यांनी चित्रपट निर्मितीमध्येही सहभाग घेतला आहे. चित्रपट निर्मितीसोबतच तो अभिनयही करतो. गेल्या काही वर्षांत त्यांनी आपला व्यवसाय झपाट्याने विकसित केला आहे. त्यामुळे त्यांचे व्यावसायिक वैरही वाढले आहे. यामुळेच काही महिन्यांपूर्वी जीवाला धोका असल्याचे कारण देत तक्रार देण्यासाठी ते पोलिस ठाण्यात गेले होते. त्यांच्या सुरक्षिततेची मागणी केली होती.