मुंबई,दि.24: भाजपाची एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाला कमळ चिन्हावर लढण्याची ऑफर देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष व चिन्ह देण्यात आले आहे. तर अजित पवार यांना राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह देण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीची तयारी सर्व राजकीय पक्ष करत आहेत.
महाराष्ट्रात शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची भाजपाबरोबर युती आहे. तिन्ही पक्ष लोकसभा निवडणुकीत एकत्रपणे सामोरे जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीचे जागा वाटप अद्याप झालेले नाही. मात्र राज्यात भाजपाच जास्त जागा लढवणार आहे.
उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटाबद्दल एक धक्कादायक दावा केला आहे. या दोन्ही गटांना भारतीय जनता पार्टीने कमळ चिन्हावर निवडणूक लढण्याची ऑफर दिली होती असं संजय राऊत म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाच्या तुतारी वाजवणारा माणूस या पक्षचिन्हाचं अनावरण आज रायगडावर झालं. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्रातील 11 कोटी जनता यापुढे हातात मशाल घेऊन तुतारीच वाजवणार आहे,” असं संजय राऊत म्हणाले. चिन्हाचाच संदर्भ घेत राऊत यांनी भाजपाने शिंदे गट आणि अजित पवार गटाला कमळ याच चिन्हावर लढण्याची ऑफर दिल्याचं राऊत यांनी म्हटलं. “भाजपाने अजित पवार गट आणि शिंदे गटापुढे प्रस्ताव ठेवलेला की तुमचे उमेदवार कमळ चिन्हावर लढतील. (शिंदे गटाला) धनुष्यबाण मिळालं असलं तरीही लोक तुम्हाला मतदान करणार नाहीत. तसेच (अजित पवार गटाला) घड्याळ जरी दिलं असलं तरीही तुम्हाला लोक मतदान करणार नाही. त्यामुळे तुम्ही कमळावरच लढा, कमळाबाईच्या पदराखाली लपा आणि निवडणूक लढा असा प्रस्ताव जे. पी. नड्डांनी दिला आहे,” असं राऊत म्हणाले. ते इतक्यावर थांबले नाहीत तर, “हे जर खोटं असेल तर त्यांनी समोर येऊन सांगावं”, असं आव्हानही संजय राऊतांनी दिलं आहे.