मुंबई,दि.20: उध्दव ठाकरे यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेना पक्ष व चिन्हावर दावा सांगितला. एकनाथ शिंदे यांचाच शिवसेना पक्ष असल्याचा निकाल निवडणूक आयोगाने व विधानसभा अध्यक्षांनी दिला आहे. अशातच उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने आज विशेष अधिवेशन बोलावलं. मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षणाचा प्रस्ताव सभागृहात मंजूर करण्यात आला. मराठा आरक्षण विधेयकाचा मसुदा विधी मंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
‘ज्या ज्या वेळी हा विषय आमच्यासमोर आला तेव्हा सभागृहाने हा ठराव एकमताने मंजूर केला. ज्या पद्धतीने अभ्यास करून हा प्रस्ताव मांडला गेला आणि विधेयक मंजूर झालं, कायद्याच्या सर्व निकषांवर, सर्व पातळींवर हे आरक्षण टिकेल याची मला आशा वाटते. सभागृहाला काही समजून सांगण्याची गरज नव्हतीच कारण सभागृहाने दोन्ही वेळी एकमताने याला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मराठा समाजालाही धन्यवाद द्यायचे आहेत, कारण त्यांनी खूप लढा दिला आहे’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“मला राजकारणाबाबत जास्त काही बोलायचं नाही. कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिलंय, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. एकच प्रार्थना करतो की, पूर्वीचे सर्व अनुभव लक्षात घेऊन हे आरक्षण कायद्याच्या सर्व पातळीवर टिकेल. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळेल, अशी मी आशा बाळगतो”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच “हे आरक्षण शिक्षण आणि नोकरीत दिलं आहे. शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यावर याबाबत स्पष्ट होईल. पण तातडीने आता किती जणांना मराठा समाजातील तरुणांना कुठे नोकरी मिळणार हे सरकारने सांगितलं तर सोन्याहून पिवळं होईल”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘मराठा समाजातील बांधवांना किती आणि कुठे नोकऱ्या मिळणार आहेत, हे सरकारने जाहीर केलं तर सोन्याहून पिवळं होईल. दोन मतं असती तर सभागृहात एकमताने मंजूरच केलं नसतं. मागच्या महिन्यातही गुलाल उधळला गेला होता, त्यानंतर फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. आतासुद्धा सरकारने हमी घेतली आहे ती निवडणुकीच्या तोंडावर घेतली आहे. निवडणूक काढून नेण्याचा डाव नसेल ना, असा प्रश्न आज उपस्थित करत नाही, कारण मला यात राजकारण करायचं नाही. पूर्ण खात्री पटल्याशिवाय या सरकारवर विश्वास ठेवणं कठीण आहे’, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं.