मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सोलापूर जिल्ह्यात आंदोलन

0

सोलापूर,दि.१६: मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करीत असलेले मनोज जरांगे-पाटील यांना समर्थन देण्यासाठी सकल मराठा समाज बांधवाच्यावतीने कामती बुद्रुक (ता मोहोळ) येथे कडकडीत बंद पाळत कोल्हापूर-सोलापूर महामार्ग तब्बल दोन तास रोखला. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. यावेळी शेकडो समाज बांधवांनी सहभाग घेत जरांगे पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा व्यक्त केला.

मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन राज्य शासनाने काढलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करण्यात यावे यासाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा सुरु केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने कामती बंदची हाक देण्यात आली होती. बंदच्या आवाहनाला गावातील दुकानदार व्यापारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली. कडकडीत बंदमुळे बसस्थानक परिसर, व्यापारी पेठ येथे दिवसभर शुकशुकाट दिसून आला.

दरम्यान सकाळी दहाच्या सुमारास समाज बांधवांनी महामार्गावर ठिय्या मारत रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी गावनिहाय कुणबी नोंदींची यादी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. तालुक्यात आतापर्यंत किती कुणबी नोंदी सापडल्या, किती दाखले देण्यात आले, मोडी लिपीत सापडलेल्या नोंदीच्या नागरिकांच्या वंशावळ शोधण्यासाठी प्रयत्न होत नसल्याचे यावेळी आंदोलकांनी नायब तहसिलदार संदीप गायकवाड यांना दाखवून दिले. 

याप्रसंगी सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने नायब तहसिलदार संदीप गायकवाड यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी अशोक भोसले, बाळासाहेब डुबे-पाटील, प्रकाश पारवे, मालोजी भोसले, श्रीनिवास भोसले, दत्तात्रय भोसले, विनोद भोसले, नितीन गरड, प्रज्वल खराडे, भैरवनाथ पाटील, जयवंत सराटे, तानाजी पवार, ऋषिकेश भोसले, यश खराडे, विजय पवार, आशुतोष बाबरे, राहुल भोसले आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कामतीचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला केला होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here