Corruption Perceptions Index 2023: जगातील सर्वाधिक भ्रष्ट देशांची यादी जाहीर

0

नवी दिल्ली,दि.31: Corruption Perceptions Index 2023: जगातील सर्वाधिक भ्रष्ट देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भ्रष्टाचार ही जगाला लागलेली कीड आहे. अनेक देशात सर्रास भ्रष्टाचार होतो. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल (Transparency International) या भ्रष्ट देशांची यादी जाहीर करणाऱ्या संस्थेने मंगळवारी 2023 सालचा ग्लोबल करप्शन इंडेक्स जाहीर केला आहे. 180 देशांच्या यादीत भारत 8 स्थानांनी घसरून 93व्या स्थानावर आला आहे. म्हणजेच भारतापेक्षा 87 देशांमध्ये जास्त भ्रष्टाचार आहे. त्याचबरोबर भारतात 92 देशांपेक्षा जास्त भ्रष्टाचार आहे.

180 देशांच्या यादीत दोन तृतीयांश देशांचा स्कोअर 50 च्या खाली आहे. म्हणजेच दोन तृतीयांश देशांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे. त्याच वेळी, भ्रष्टाचाराचा सरासरी स्कोर 43 आहे. अहवालानुसार, सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचारात सर्वात कमी सुधारणा नोंदवण्यात आली आहे.

अहवालात म्हटले आहे की भ्रष्टाचार धारणा निर्देशांक (CPI) 2023 दर्शवितो की बहुतेक देशांनी सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराचा सामना करण्यासाठी थोडीशी किंवा कोणतीही सुधारणा केली नाही. ही यादी सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या आधारे तयार करण्यात आली आहे. शून्य गुण म्हणजे सर्वात भ्रष्ट आणि 100 गुण म्हणजे सर्वात प्रामाणिक.

हा आहे सर्वात कमी भ्रष्ट देश | Corruption Perceptions Index 2023

ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने जारी केलेल्या अहवालात डेन्मार्कला सर्वात कमी भ्रष्टाचारी देश म्हणून घोषित करण्यात आले आहे. डेन्मार्कने सलग सहाव्या वर्षी अव्वल स्थान पटकावले आहे. न्याय व्यवस्थेतील चांगल्या सुविधांमुळे डेन्मार्कने 100 पैकी सर्वाधिक 90 गुण मिळवले आहेत.

तर फिनलंड आणि न्यूझीलंड अनुक्रमे 87 आणि 85 गुणांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. यावर्षी टॉप 10 देशांमध्ये नॉर्वे (84), सिंगापूर (83), स्वीडन (82), स्वित्झर्लंड (82), नेदरलँड (79), जर्मनी (78) आणि लक्झेंबर्ग (78) यांचा समावेश आहे.

सर्वाधिक भ्रष्ट देशांची यादी

या यादीत सोमालिया (11), व्हेनेझुएला (13), सीरिया (13), दक्षिण सुदान (13) आणि येमेन (16) हे देश तळाशी आहेत. या सर्व देशांना दीर्घकाळ सशस्त्र संघर्षांचा फटका बसला आहे. निकाराग्वा (17), उत्तर कोरिया (17), हैती (17), इक्वेटोरियल गिनी (17), तुर्कमेनिस्तान (18) आणि लिबिया (18) मध्येही भ्रष्टाचार शिखरावर आहे.

भारत

ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार भारत यावर्षी 93व्या स्थानावर आहे. CPI मार्किंगमध्ये, भारताला 100 पैकी 39 क्रमांक देण्यात आला आहे. गेल्या वर्षी 2022 मध्ये भारत 85 व्या स्थानावर होता. तर, सीपीआय मार्किंगमध्ये 40 गुण देण्यात आले होते.

या यादीत शेजारी देश पाकिस्तान 134 व्या स्थानावर आहे. CPI मार्किंगमध्ये पाकिस्तानला 29 गुण मिळाले आहेत. तर श्रीलंकेचे 34 गुण झाले आहेत. अफगाणिस्तान आणि म्यानमारला 20 गुण, चीनला 42 आणि बांगलादेशला 24 गुण मिळाले आहेत. म्हणजेच अहवालानुसार भारतापेक्षा चीनमध्ये कमी आणि पाकिस्तानमध्ये भारतापेक्षा जास्त भ्रष्टाचार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here