तिरुवनंतपुरम,दि.30: भाजपा नेत्याच्या हत्त्याप्रकरणात PFI च्या 15 सदस्यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. केरळमधील भाजपा नेत्याच्या हत्येप्रकरणी तब्बल चार वर्षांनंतर न्यायालयाने निकाल दिला आहे. या प्रकरणात दोषी आढळलेल्या सर्व आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या घटनेत सहभागी असलेले सर्व गुन्हेगार हे बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेशी संबंधित आहेत.
भाजपच्या ओबीसी शाखेच्या नेत्याच्या हत्येप्रकरणी केरळ न्यायालयाने 15 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. हे सर्व गुन्हेगार पीएफआय या प्रतिबंधित संघटनेशी संबंधित आहेत. न्यायालयाने शनिवारी या 15 जणांना दोषी घोषित केले होते. या दोषींना मावळीकर जिल्हा न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.
भाजपा नेत्याच्या खुनाच्या घटनेत आठ आरोपींचा सहभाग होता, तर उर्वरित आरोपींना गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभाग असल्याचे सिद्ध झाल्याने मावळीकर जिल्हा न्यायालयाने सर्व आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

घरच्यांसमोरच हत्त्या
केरळमधील भाजपा ओबीसी मोर्चाचे सचिव रणजीत श्रीनिवासन यांची 19 डिसेंबर 2021 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. मारेकऱ्यांनी अलाप्पुझा येथील त्यांच्या घरी त्यांच्या कुटुंबियांसमोर हत्त्या केली. हे सर्व आरोपी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) शी संबंधित होते.