मुंबई,दि.13: ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असल्याचा शिंदे गटाच्या मंत्र्याने दावा केला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्र प्रकरणात निकाल दिला. निकालामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांचाच शिवसेना पक्ष असल्याचे निकाल दिला. ठाकरे गटाला पक्ष व चिन्हाला मुकावे लागले. ठाकरे गटाची आमदार अपात्र करण्याची मागणी नार्वेकर यांनी फेटाळली.
विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयाला उद्धव ठाकरे गट सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे. मात्र, कोर्टात हा खटला चालेपर्यंत विधानसभेच्या निवडणुका होऊन जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे गटाला पक्ष आणि पक्ष चिन्हाशिवायच निवडणुकीला सामोरे जावं लागणार असल्याने ठाकरे गटाच्या आमदार, खासदार आणि नगरसेवकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी 14 तारखेनंतर मोठा धक्का ठाकरे गटाला बसणार असल्याचा दावा केला आहे. उदय सामंत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्रता प्रकरणावर निकाल दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. हा निकाल लागल्यानंतर काय घडू शकणार आहे ही आतली बातमीच उदय सामंत यांनी सांगितली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातून तर्कवितर्क लढवले जात आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आमच्याकडे येणार आहेत. 14 तारखेपासून काय होतंय ते पहा, असं थेट विधानच उदय सामंत यांनी केलं आहे. त्यामुळे कोणते आमदार शिंदे गटात येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच उद्यापासून राज्यात काय काय घडणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.