मुंबई,दि.२९: शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मनसे आणि शिवसेनेबाबत (शिंदे गट) मोठा दावा केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच (दि.२८) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ठाकरे आणि शिंदे यांची या महिन्यातील ही दुसरी भेट आहे. यापूर्वी २ डिसेंबरला हे दोन्ही नेते एकमेकांना भेटले होते. राज ठाकरे यांनी वर्षभरात अनेकवेळा एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.
मनसेने मराठी पाट्यावरून अलिकडे आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्रातील सर्व दुकानावरील पाट्या मराठीतच पाहिजे अशी मनसेची भुमिका आहे. राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली आहे. यावेळी राज यांच्यासोबत मनसे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर हेदेखील उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लढवण्यात आले. त्यातच, शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना-मनसे एकत्र येण्याबाबत मोठं विधान केलं आहे. फेब्रुवारी महिन्यात हे दोन्ही नेते एकत्र येऊ शकतात, असा दावाच संजय शिरसाट यांनी केला आहे.
राज ठाकरे यांनी जाहीर भाषणात आणि पत्रकार परिषदांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या बंडाचं समर्थन केलं होतं. तर, शिवसेना उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीसोबत गेल्यावरुन टोलाही लगावला होता. आता, शिवसेनेतील अभूतपूर्व बंडानंतर शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना आणि मनसे एकत्र येईल, असा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.
मनसेने स्वतंत्र किंवा महायुतीसोबत निवडणूक लढवली तर लोकसभेचे गणित कसे असेल, याचा अभ्यास महायुतीकडून केला जात आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात राज ठाकरे यांनी आपले पत्ते खुले केलेले नाहीत. त्यामुळे मनसेच्या भूमिकेविषयी संभ्रम कायम आहे. मात्र, संजय शिरसाट यांच्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.