मुंबई,दि.28: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांनी वर्षभरात अनेकवेळा एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मनसेने मराठी पाट्यावरून अलिकडे आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्रातील सर्व दुकानावरील पाट्या मराठीतच पाहिजे अशी मनसेची भुमिका आहे. राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली आहे. यावेळी राज यांच्यासोबत मनसे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर हेदेखील उपस्थित होते.
गेल्या वर्षभरातील ही सहावी भेट आहे. राज ठाकरे यांनी मराठी पाट्या, टोलनाक्यांवर होणारी अतिरिक्त वसुली आणि बीडीडी चाळ अशा विविध मुद्द्यांवर मागील काही महिन्यांत अनेकदा मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली आहे. मात्र आजची भेट नेमक्या कोणत्या कारणासाठी झाली, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विविध विकासकामांबाबत आपल्या सूचना मांडण्यासाठी राज ठाकरे भेट घेत असतात. मात्र अलीकडील काळात या दोन नेत्यांच्या भेटीगाठी मोठ्या प्रमाणात होत असल्याने यामागे आगामी निवडणुकांसाठी नवी समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. कारण उद्धव ठाकरे यांना आव्हान देत शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची जवळीक आणखीनच वाढली आहे. त्यामुळे या दोघांमधील मैत्रीपूर्ण संबंध निवडणुकीच्या आखाड्यातही दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
देशातील लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. अशात राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला पोहोचले आहेत. या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.