बार्शी,दि.२२: बार्शी-धाराशिव मार्गावर एस टी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात होऊन तीन जण जागीच ठार झाले. गुरूवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तांदुळवाडीच्या नजीक फॉरेस्टजवळ हा अपघात झाला.
पांगरी पोलिसांत या अपघाताची नोंद करण्यात आली असून या अपघातात मयत झालेल्यांमध्ये कार्तिक रोहित यादव ( वय १७ ), ओंकार अनिल पवार ( वय २०) व ओम दत्ता आतकरे ( वय २२, सर्व रा. धाराशिव) यांचा समावेश आहे.
याबाबत मिळलेली अधिक माहिती अशी की, राज्य परिवहन महामंडळाची पुणे-धाराशिव एस टी. बस (एम एच ४० ९७५६) ही बार्शीमार्गे धाराशिवकडे जात होती. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास धाराशिव येथून दुचाकीवरून तिघे जण बार्शीच्या दिशेने येत असताना तांदुळवाडी नजीक भीषण अपघात झाला.
या अपघातानंतर एस. टी. बस रस्त्याच्या बाजूला जाऊन कोलमडली, तर दुचाकी गाडीवरील वरील तिघेजण जागीच ठार झाले.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पांगरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपात्रे यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचले. या अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनीदेखील मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली.