मुंबई,दि.11: राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रत्येक शेतकऱ्याला कमीत कमी किती रूपये विमा मिळणार हे सांगितले आहे. राज्यात गेल्या काही काळापासून अवकाळी पाऊस आणि दुष्काळ अशी विविध संकटं शेतकऱ्यांची कंबरडं मोडत आहेत. अशा परिस्थितीत राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला जायला हवा अशी भावना सभागृहात हिवाळी अधिवेशना दरम्यान मांडण्यात आली. यावर उत्तर देताना, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात एक महत्त्वाची घोषणा केली. राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्या अंतर्गत विविध रकमेचा विमा देण्यात आला आहे. परंतु एखाद्या शेतकऱ्याला कमीत कमी एक हजार रूपयाचा विमा नक्की मिळेल अशी महत्त्वपूर्ण घोषणा मंत्री मुंडे यांनी केली. आज प्रश्नोत्तराच्या तासात ते बोलत होते.
विविध जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना एक हजार रुपये पेक्षा कमी विमा रक्कम मिळाल्याच्या बाबी काही सदस्यांनी उपस्थित केल्या. त्यावर ज्या शेतकऱ्यांना मिळणारी विमा रक्कम एक हजार पेक्षा कमी असेल, त्या शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये पीकविमा दिला जाईल, याबाबत कार्यवाही सुरू आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. राज्यातील २४ जिल्ह्यांत खरीप हंगामात प्रधानमंत्री पीकविमा योजना अंतर्गत सुमारे 52 लाख शेतकऱ्यांना अंदाजे 2216 कोटी रुपये इतका अग्रीम पीकविमा 25% प्रमाणे मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी आज सकाळपर्यंत 1690 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले असून सुमारे 634 कोटी रुपयांचे वितरण वेगाने सुरू आहे, अशीही माहिती मुंडे यांनी दिली.
काही विमा कंपन्यांचे अपील अद्याप सुनावणी स्तरावर आहेत, ते अपील निकाली निघाल्यानंतर मंजूर पिकविम्याच्या रक्कमेत आणखी मोठी वाढ होणार आहे, असल्याचीही माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.