सोलापूर,दि.२२: शेतकऱ्यावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी मामा भाचीस अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. यात हकिकत अशी की, दिनांक ०४/०५/२०२३ रोजी यातील फिर्यादी बनसिध्द चंदूरशा बिराजदार राहणार दोड्डी ता. दक्षिण सोलापूर हे शेतामध्ये पाणी देवून घरी आल्यानंतर त्यांचे सख्खे भाऊ नागनाथ बिराजदार यांची मोटारसायकल आडवी लावलेली होती. त्यावेळी सदर फिर्यादीने त्यांचा भाऊ नागनाथ बिराजदार यास सदरची मोटारसायकल काढण्याची विनंती केली.
त्यावेळी नागनाथ बिराजदार यांची पत्नी भंगारेव्वा बिराजदार मुलगा कटयाप्पा बिराजदार व भाच्ची तथा सून रेणूका बिराजदार यांनी फिर्यादीस शिवीगाळ केली व तसेच लाकडी काठी व लोखंडी सळईने फिर्यादीवरती जीवघेणा हल्ला केला. सदर हल्ल्यात सदर फिर्यादीच्या डोक्यास जबर जखमा झाल्या त्यांनतर सदर फिर्यादीस सिविल हॉस्पिटल सोलापूर येथे दाखल करण्यात आले व त्याची फिर्याद सिविल हॉस्पिटल सोलापूर येथे घेण्यात आली.
यातील आरोपी नागनाथ चंदूरशा बिराजदार व रेणुका कटयाप्पा बिराजदार यांनी अटक होण्याच्या भितीपोटी अॅड. अभिजीत इटकर यांच्यामार्फत सोलापूर येथील सत्र न्यायालय येथे अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला. यात आरोपीतर्फे असा युक्तीवाद करण्यात आला की, सदर फिर्यादीस सदर आरोपीने लाथा बुक्क्याने जबर मारहाण केली असती तर त्याप्रमाणे त्याच्या शरीरावर लाथा बुक्क्याच्या जखमा आढळून येणे अपेक्षित आहे. परंतु सदर फिर्यादीचे वैदयकिय प्रमाणपत्र बघता सदर फिर्यादीस लोखंडी सळई व लाकडी काठीने मारहाण झाल्याच्या जखमा दिसून येत असून त्यास लाथा बुक्क्याने मारहाण झाल्याच्या जखमा आढळून येत नाहीत.
त्यामुळे सदर फिर्यादीस प्रत्यक्षात लाथा बुक्क्याने मारहाण झाल्याच्या घटनेबद्दल प्रथमदर्शी संशय निर्माण होतो. त्यापोटी आरोपीच्या वकिलांनी अनेक उच्च न्यायालयाचे निवाडे दाखल केले. सदरचा युक्तीवाद ग्राहय धरुन सत्र न्यायाधीश आय. ए. शेख यांनी आरोपी नागनाथ चंदूरशा बिराजदार व रेणुका कटयाप्पा बिराजदार राहणार दोड्डी ता. दक्षिण सोलापूर यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.
यात आरोपीतर्फे अॅड. अभिजीत इटकर, अॅड. मंगेश काळे, अॅड. संतोष आवळे अॅड. फैयाज शेख, अॅड. सुमित लवटे, यांनी काम पाहिले.