मुंबई,दि.२७: भारताचा उल्लेख करत जो बायडेन यांनी इस्रायल-हमास युद्धाबाबत मोठं वक्तव्य केले आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील सशस्त्र संघटना हमासमध्ये गेल्या २१ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत ९,००० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. या युद्धामुळे जगाची दोन गटांमध्ये विभागणी झाली आहे. या युद्धात अनेक राष्ट्र इस्रायलच्या बाजूने उभी आहेत. तर अनेक देशांनी पॅलेस्टाईनला पाठिंबा दर्शवला आहे. त्याचबरोबर वेगवेगळे देश, वृत्तसंस्था आपापल्या परिने या युद्धाचं विश्लेषण करत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन सातत्याने या युद्धावर भूमिका मांडत आहेत. दरम्यान, बायडेन यांनी नुकतंच या युद्धाबाबत भारताचा उल्लेख करत मोठं वक्तव्य केलं आहे.
जो बायडेन म्हणाले, भारत-मिडल ईस्ट इकोनॉमिक कॉरिडोर हा इस्रायल-हमास युद्धामागचं कारण असू शकतो. अलिकडेच नवी दिल्ली येथे जी-२० शिखर परिषद भरली होती. या परषदेत, भारत-मिडल ईस्ट कॉरिडोरची घोषणा करण्यात आली. या कॉरीडोरची घोषणा ही या युद्धाचं कारण असू शकते. कॉरिडोरच्या घोषणेमुळेच हमासने इस्रायलवर हल्ला केला असावा, असं मला वाटतं.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार जो बायडेन यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांच्याबरोबरच्या बैठीकनंतर हे वक्तव्य केलं. बायडेन म्हणाले, माझा असा केवळ अंदाज आहे. हे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे कोणताही पुरावा नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत या कॉरिडोरची घोषणा केली होती. या प्रकल्पामुळे भारत आणि मध्य-पूर्वेतील अनेक देश रेल्वेमार्गाने जोडले जाणार आहेत.
जी-२० सदस्य राष्ट्रांच्या शिखर परिषदेत भारत, पश्चिम आशिया आणि युरोपला जोडणारी एक दळणवळण मार्गिका (कनेक्टिव्हिटी कॉरिडोर) लवकरच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पात भारतासह संयुक्त अरब अमिराती, सौदी अरब, युरोपियन संघ, फ्रान्स, इटली, जर्मनी आणि अमेरिका असे मोठे देश सहभागी झाले आहेत. व्यापारासाठी, दळणवळणासाठी आणि पायाभूत सुविधांमधील सहकार्याच्या दृष्टीने हा प्रकल्प राबवला जाणार आहे.