सोलापूर,दि.८: विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. देवेंद्र अक्कलकोट येथे फडणवीसांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमीपूजन झाले. यावेळी फडणवीस यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. धनंजय मुंडे यांनी आयोजित केलेल्या दिवाळी कार्यक्रमात प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी (Sapna Chaudhary) हिच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमानंतर धनंजय मुंडे यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यानंतर आज राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीही धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे.
‘धनंजय मुंडे यांनी भाजपला मातीत गाडल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही, अशी टीका मुंडेंनी केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना फडणवीस यांनी भाजप मुंबईच्या मातीतून उभी राहीली आहे. २ वरुन ३०२वर गेलेली हा पार्टी आहे. चार- सहा खासदार असलेल्या पक्षाच्या नेत्याने आम्हाला सांगण्याचं कारण नाहीये. आम्हाला मातीत गाडणारे स्वतः गाडले गेले, आम्हाला गाडू शकले नाही,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
तसंच, ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत. एसटी संप सुरू आहे आणि नाच गाणं करण्यात मग्न आहेत. हे आम्हाला सांगून राहिले मातीत गाडून टाकू. भाजपचा कार्यकर्ता हा देखील तुम्हाला पुरेसा आहे. अशा वल्गना करू नका, सामान्य माणसाच्या हिताचे काय काम आपण करु शकतं हा प्रयत्न तुम्ही करा,’ असं आव्हानच देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.