मुंबई,दि.८: राष्ट्रवादीचे नेते राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे समीर वानखेडे यांच्या मेहुणीच्या विरोधात सुरू असलेल्या खटल्याच्या संदर्भात आरोप केले आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे (NCB) अधिकारी समीर वानखेडे यांची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्ज व्यवसायात गुंतलेली आहे का? असा संशय व्यक्त करत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज एक ट्वीट केलं आहे. समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी तात्काळ त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. हर्षदा रेडकर (Harshada Redkar) यांच्या विरुद्ध प्रलंबित असलेल्या प्रकरणाशी आपला अजिबात संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
‘समीर वानखेडे यांची मेहुणी हर्षदा रेडकर ड्रग्स व्यवसायात गुंतलेली आहे का? पुण्यातील कोर्टात तिच्या नावावरील केस प्रलंबित आहेत. हा घ्या पुरावा,’ असं म्हणत, नवाब मलिक यांनी आज सकाळी एक ट्वीट केलं होतं. त्या ट्वीटसोबत ई कोर्ट सर्व्हिसवरील काही फोटो शेअर केले होते. या प्रकरणाचा समीर वानखेडे यांच्याशी नेमका काय संबंध याचं उत्तर त्यांनी द्यायलाच हवं,’ असं मलिक यांनी म्हटलं होतं.
मलिक यांच्या या ट्वीटनंतर वानखेडे यांनी तात्काळ खुलासा केला आहे. ‘हर्षदा रेडकर यांच्या विरुद्धच्या प्रकरणाचा माझ्याशी काहीही संबंध नाही. ही केस जानेवारी २००८ ची आहे. या प्रकरणानंतर ९ वर्षांनी, म्हणजेच २०१७ साली क्रांती सोबत माझं लग्न झालं. शिवाय, २००८ साली मी एनसीबीच्या सेवेतही नव्हतो. मग त्या प्रकरणाशी माझा संबंध कसा असू शकतो? यात विनाकारण माझं नाव गोवलं जात आहे,’ असं वानखेडे यांनी म्हटलं आहे.
क्रांती रेडकर यांची दुपारी पत्रकार परिषद
समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर आज दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील कारवाईनंतर समीर वानखेडे हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्या कुटुंबावर रोज वेगवेगळे आरोप होत आहेत. आज क्रांती रेडकर यांच्या बहिणीबद्दल नवाब मलिक यांनी धक्कादायक माहिती समोर आणली आहे. त्यामुळं त्या नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.