आंबेगाव,दि.२: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रविवारी, १ ऑक्टोबर जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. जुन्नर तालुक्यातील आदिवासी मेळाव्याला त्यांनी हजेरी लावली होती. जुन्नरवरून शरद पवार यांनी आपली गाडी थेट एकेकाळच्या सगळ्यात विश्वासू सहकारी असलेल्या मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या आंबेगाव मतदारसंघात वळवली. यावेळी वळसे-पाटील यांच्या समर्थकांनी शरद पवार यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं.
दिलीप वळसे-पाटील यांनी अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शरद पवार आणि वळसे-पाटील यांच्या कुटुंबात दुरावा निर्माण झाला आहे. पक्ष फुटीनंतर शरद पवार हे पहिल्यांदाच आंबेगाव तालुक्यात आले होते. कार्यकर्त्यांच्या आग्रहाला मान देऊन शरद पवार आंबेगाव तालुक्यात आले. यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं.
सत्ता येते आणि जाते, पण…
शरद पवार म्हणाले, “अनेकांचा आग्रह होता की आंबेगाव तालुक्यात येऊन जावं. राज्याच्या राजकारणात काही बदल झालेत. सत्ता येते आणि जाते, पण सत्तेला चिकटून राहायचं नाही. चिकटून राहण्याची भूमिका घेतल्यानंतर लोक कधी ना कधीतरी कायमचा निकाल दिल्याशिवाय राहत नाही. आंबेगाव तालुक्यात एक जाहीर सभा घ्यावी हा आग्रह याची पूर्तता लवकरच करेन.”
दरम्यान, जुन्नरमध्ये शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा शरद पवार यांनी म्हटलं, “महाराष्ट्रात आणि बाहेर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संस्थापक कोण, ते सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे लोकांची भावना ही अनुकूल आहे, असं आमचे लोक सांगतात, त्यात तथ्य आहे. कुणी वेगळी भूमिका घेतली असेल, तर तो त्यांचा लोकशाहीमधील अधिकार आहे. त्यावर मी भाष्य करू इच्छित नाही.”