पुणेदि.३०: जयंत पाटील यांनी अजित पवार गटाच्या आमदारांबाबत मोठा दावा केला आहे. अजित पवारांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादी पक्षात फूट पडली. अजित पवारांनी पक्षावर दावा सांगितला आहे. जे झाले ते चुकीचे असे सांगत अजित पवार यांच्यासोबत गेलेले सर्व आमदार स्वगृही परतण्याच्या विचारात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी केला. काहीजण पक्ष स्थापन करणाऱ्या संस्थापक अध्यक्षांना पदावरून दूर करून आपलाच पक्ष खरा असल्याचा अविर्भाव आणत आहेत, अशी टीका त्यांनी अजित पवार यांचा नामोल्लेख टाळून केली.
काय म्हणाले जयंत पाटील?
कोणत्याही पक्षाचे आमदार दुसरीकडे गेले तर त्यांच्यासोबत पक्षही गेला ही भावनाच मुळात चुकीची आहे. दुसरीकडे गेलेले अनेक आमदार जे झाले ते चुकीचे झाल्याचे सांगत आमच्याकडे परत येण्याच्या विचारात आहेत, असे पाटील यांनी एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले असता पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पाटील म्हणाले, निवडणूक आयोगापुढे आम्ही आमची बाजू स्पष्ट केली आहे. शरद पवार यांनी निवडणूक आयोगाला आपली बाजू ऐकून घेण्याची विनंती केली. पण, त्यानंतरही निवडणूक आयोगाने ६ ऑक्टोबर रोजी सुनावणी निश्चित केली. दुसरा गटही शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष असल्याचे सांगत आहे. पण, नंतर वेगळी भूमिका मांडत आहे. पण, निवडणूक आयोग सर्व जाणतो आहे. तो लवकरच योग्य तो निर्णय घेईल असा आम्हाला विश्वास आहे. आगामी लोकसभा निवडणूक सहा महिन्यांत तर विधानसभा निवडणूक आठ ते दहा महिन्यांत होण्याची शक्यता असल्यामुळे या प्रकरणी तातडीने निर्णय होणे अपेक्षित आहे.