नवी दिल्ली,दि.7: दिल्लीतील प्रदूषण दिवाळीत वाढल्याचा दावा अनेक तज्ज्ञानीं केला. फटाक्यांमुळे दिल्लीतील प्रदूषणात वाढ झाली, हवा दूषित झाली असे तज्ज्ञाचं म्हणणं आहे. फटाक्यांवर बंदी असताना देखील दिल्लीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात फटाके फोडले गेले. त्यानंतर दिल्लीतील (Delhi Pollution) हवा धूसर झाली. धुकं पसरावं तसं दिल्लीतील वातावरण होतं.
यासोबतच वाऱ्याची दिशा बदलल्याने प्रदूषणाची परिस्थिती गंभीर बनल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आजूबाजूच्या राज्यांमध्ये पराली जाळल्याने धूर वाऱ्याच्या दिशेने दिल्लीत आला आहे. त्यामुळे आकाशात धुक्याची चादर पसरली आहे.
सिस्टम ऑफ एअर क्वॉलिटी अँड वेदर फॉरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR) ने आज जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आजही दिल्लीतील हवा गंभीर श्रेणीत आहे. दिल्लीचा एअर क्वॉलिटी इंडेक्स (AQI) 436 नोंदवला गेला आहे.
मात्र केवळ दिवाळीत फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे दिल्लीचं प्रदूषण वाढलं हे अनेकांना पटलेलं नाही. त्यामुळे अनेकांना ट्विटरवर याबाबत नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली. दिल्लीतच्या प्रदूषणाला केवळ दिवाळीत फुटलेले फटाकेच जबाबदार नाहीत, असे दावे ट्विटरवर करण्यात येत आहेत. त्यामुळे #DontBlameDiwali हा हॅशटॅग सध्या ट्विटरवर ट्रेंड होत आहे.
एका यूजरने प्रश्न उपस्थित करत लिहिलं की, प्रत्येकवेळी हिंदू सणांनाच का? खरे प्रश्न का उपस्थित केले जात नाहीत?
एका यूजरने तर दिल्लीच्या प्रदूषणाबाबत एक चार्ट शेअर करुन प्रदूषणाची नेमकी कारणे काय आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केलाय.
एका यूजरने लिहिलं की, फक्त दिवाळीतच प्रदूषणाबाबत सल्ले का दिले जातात?