शरद पवार आणि अजित पवार यांची झाली गुप्त बैठक?

0

पुणे,दि.12: शरद पवार आणि अजित पवार यांची गुप्त बैठक झाल्याचे वृत्त टीव्ही 9 मराठीने दिले आहे. अजित पवारांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दोघांमध्ये बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यातल्या कोरेगाव पार्क येथे दोघांची बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. एका व्यावसायिकाच्या घरी ही बैठक पार पडल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या घरी ही बैठक पार पडली. चोरडिया यांच्या घरातून आधी शरद पवार बाहेर पडले. तर अजित पवार यांचा गाड्यांचा ताफा आतमध्येच होता. शरद पवार बाहेर पडल्यानंतर काही वेळाने अजित पवार यांचा ताफा बाहेर पडणार असल्याची माहिती समोर येत आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये भेट होवून अर्धा तास चर्चा झाल्याची वृत्त ‘टीव्ही 9 मराठी’ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गट आणि शरद पवार गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांनंतर आज प्रत्यक्षपणे शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. ही भेट नेमकी का घडून आली? या भेटीचं नेमकं कारण काय, काय चर्चा झाली? याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाहीय.

शरद पवार आणि अजित पवार यांची झाली गुप्त बैठक?

पुण्यातल्या कोरेगाव पार्कमध्ये लेन नंबर 3 आहे. या परिसरात 73 नंबरच्या बंगल्यात दोन्ही नेत्यांची भेट झाल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार निघून गेले आहेत. पण अजित पवार यांची गाडी बंगल्याच्या गेटच्या आतमध्ये आहे. गाडीसोबत वाहनचालकही आतमध्ये आहे. अजित पवार आज पुण्यातील चांदणी चौकच्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते थेट सर्किट हाऊस येथे पोहोचले. त्यांचा ताफा सर्किट हाऊस याच ठिकाणी ठेवलेला आहे. पण ते एका खासगी गाडीने कोरेगाव पार्क परिसरात पोहोचले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here