मुंबई,दि.२: Nitin Desai: कलादिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या केली आहे. मनसे नेत्याने गंभीर दावा केला आहे. सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याची बाब उघड झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. नितीन देसाई हे मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी, तसेच मालिका व नाटकांसाठी भव्य असे सेट उभारण्यासाठी प्रसिद्ध होते. मात्र, कर्जतमधील त्यांच्या स्टुडिओमध्ये त्यांनी मंगळवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे कला, सामाजिक व राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र, आता त्यांच्या आत्महत्येमागच्या कारणांचा शोध घेतला जात असून त्यासंदर्भात मनसेच्या रायगड अध्यक्षांनी गंभीर दावा केला आहे.
नितीन देसाई यांनी त्यांच्या एन. डी. स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब बुधवारी सकाळी स्टुडिओमधील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी पोलिसांना कळवल्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला. त्यानंतर नितीन देसाई यांच्यावर तब्बल २४९ कोटींचं कर्ज असल्याची बाब समोर आली. कर्जबाजारीपणामुळेच नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे रायगड अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी या प्रकरणात टीव्ही ९ शी बोलताना थेट कला क्षेत्रातील काही नामांकित मंडळींच्या दिशेनं अंगुलीनिर्देश केला आहे.
नितीन देसाई अस्वस्थ होते | Nitin Desai
जितेंद्र पाटील यांनी नितीन देसाई अस्वस्थ होते असं सांगितलं आहे. “गेल्या अनेक दिवसांपासून ते जरा अस्वस्थ होते. अनेक बाबींवर ते चर्चा करायचे. आर्थिक अडचणी वगैरे तर होत्याच. पण त्यांच्याच कला क्षेत्रातून काही नामांकित व्यक्तींकडून एन. डी. स्टुडिओला शूटिंग येऊ दिल्या जात नव्हत्या. ते हे सगळं माझ्याशी बोलायचे. पण या सगळ्या गोष्टी फार क्लेशदायक आहेत”, असं जितेंद्र पाटील म्हणाले आहेत.
“आज घटना घडली आहे. लोक दादांना (नितीन देसाई) भावपूर्ण श्रद्धांजली देतील. पण या मूळ गोष्टीकडे लोकांचं लक्ष गेलं पाहिजे. एवढा मोठा मराठी कलावंत आपल्यातून हरपलेला आहे. याला कारणीभूत कोण याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे”, असं जितेंद्र पाटील यांनी नमूद केलं.
मनसे नेत्याचा गंभीर आरोप
दरम्यान, यावेळी बोलताना जितेंद्र पाटील यांनी निर्माते-दिग्दर्शकांवर दबाव टाकला जायचा, असा दावा केला आहे. “खरंतर खूप दिवसांपासून एन. डी. स्टुडिओकडे येणाऱ्या शुटिंग रद्द केल्या जायच्या. त्या कोण रद्द करायचं? निर्माते-दिग्दर्शकांवर कोण दबाव टाकायचं? हा मोठा प्रश्न आहे. इतका मोठा स्टुडिओ चालवताना त्यांना शूटिंगची कामं मिळणं महत्त्वाचं होतं. पण ते येणं कुणामुळे बंद झालं हा संशोधनाचा विषय आहे”, असं पाटील म्हणाले.
नितीन देसाईंवर होतं २४९ कोटींचं कर्ज!
नितीन देसाईंवर २४९ कोटींचं कर्ज होतं, अशी बाब आता समोर आली आहे. त्यांनी सीएफएम या वित्तीय संस्थेकडून १८० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यासाठी त्यांनी ४० एकरच्या तीन मालमत्ता तारण म्हणून ठेवल्या होत्या. कालांतराने सीएफएम या वित्तीय संस्थेने आपल्याकडील सर्व कर्ज खाते एडलवाइस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीकडे सोपवली. नितीन देसाई यांच्याकडच्या कर्जाची वसुली होत नव्हती. हळूहळू सुरुवातीला १८० कोटी असणारी कर्जाची रक्कम व्याजासह थेट २४९ कोटींवर जाऊन पोहोचली.