मुंबई,दि.१८: Kirit Somaiya Video: भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने हा व्हिडिओ दाखवल्यानंतर खळबळ उडाली आहे. आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. या व्हिडीओवर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत किरीट सोमय्यांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. तसेच व्हिडीओच्या चौकशीची मागणी केली. आता यावर स्वत: किरीट सोमय्यांनी लोकसत्ताला प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी आपण या प्रकरणी सोमवारी (१७ जुलै) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलल्याचं सांगितलं. तसेच ट्वीट करत फडणीसांना पाठवलेलं पत्रही शेअर केलं.
काय म्हणाले किरीट सोमय्या? | Kirit Somaiya Video
किरीट सोमय्या म्हणाले, “माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही. मी देवेंद्र फडणवीस यांना अशा आरोपांची व्हिडीओची सत्यता तपासावी आणि चौकशी करावी अशी विनंती केली आहे.”
किरीट सोमय्यांनी माझ्याकडून कुठल्याही महिलेवर अत्याचार झालेला नाही. याबाबत मी फडणवीसांशी बोललो असल्याचे सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांना पत्र
देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात किरीट सोमय्या म्हणाले, “देवेंद्रजी, आज सायंकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडीओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली. या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले, आक्षेप घेतले आहेत. अशाप्रकारच्या अनेक व्हिडीओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे.”
“मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडीओ क्लिप आहेत, असेही दावे केले जात आहेत. तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही, हे मी याठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी,” अशी विनंती किरीट सोमय्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे केली.
“ही व्हिडीओ क्लिप किंवा अन्य अशा व्हिडीओ क्लिप (जर कोणाकडे असल्यास किंवा प्रदर्शित झाल्यास) या सगळ्यांची सत्यता तपासावी आणि त्याची चौकशीही करावी, अशी मी आपणास विनंती करीत आहे,” असंही सोमय्यांनी नमूद केलं.