मुंबई,दि.१२: समृध्दी महामार्ग: समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) सुरु झाल्यापासून या महामार्गावर अनेक अपघात झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या अपघातांमध्ये अनेकांचे प्राण गेले तर अनेक जखमी झाले आहेत. दरम्यान, समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय घेतला आहे.
समृध्दी महामार्ग: राज्य सरकारचा मोठा निर्णय | Samruddhi Mahamarg
राज्य सरकार लवकरच समृद्धी महामार्गावर एअर अॅम्ब्युलन्स सेवा सुरू करणार आहे. यासाठी अनेक हेलिकॉप्टर कंपन्यांसोबत राज्य सरकारची चर्चा सुरु आहे. समृद्धी महामार्गावर अपघात झाल्यास रुग्णांना तात्काळ वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. एखादी दुर्घटना घडल्यास एअर अॅम्ब्युलन्सने जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करता येणं शक्य होईल आणि जखमींना योग्य उपचार मिळतील. यासाठी लवकरच राज्य सरकार संबंधित हेलिकॉप्टर कंपन्यांशी करार करणार आहे.
यापूर्वी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने समृद्धी महामार्गावर हेलिपॅड बांधण्याचा निर्णय घेतला आहे. समृ्द्धी महामार्गालगत जवळपास १६ हेलिपॅड बांधण्यात येणार आहेत. समृद्धी महामार्गावर होणारे अपघात आणि अपघातांनंतर संभाव्य आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी हे हेलिपॅड बांधण्यात येणार आहेत. प्रस्तावित आराखड्यानुसार, पहिले हेलिपॅड खर्डी ते इगतपुरी दरम्यान महामार्गाच्या बोगद्या विभागाजवळ असणार आहे, ज्याचे सध्या बांधकाम सुरु आहे.
काही दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर एका खासगी बसचा मोठा अपघात झाला होता. या अपघातात २५-२६ जणांचा मृत्यू झाला. या अपघात झाल्यानंतर जखमींना घटनास्थळी कोणतीच मदत न मिळाल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच, महामार्गावर कोणतेच ब्रेक पॉईंट नसल्याने वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे समृद्धी महामार्गावर होत असलेल्या अपघातांची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आली होती. या घटनेनंतर राज्य सरकारकडून समृद्धी महामार्गावर अनेक सुविधा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.