जळगाव,दि.10: Anil Bhaidas Patil: अजित पवार गटाचे मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी मोठा दावा केला आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बंडखोरी केल्याने दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. त्यानंतर आता अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड केले. तसंच, काँग्रेसचेही अनेक आमदार खासदार फुटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेसचे अनेक आमदार भाजपात जाण्याच इच्छुक असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री अनिल पाटील यांनीही याबाबत मोठा दावा केला आहे. ते जळगावमध्ये माध्यमांशी बोलत होते.
काय म्हणाले मंत्री अनिल भाईदास पाटील? | Anil Bhaidas Patil
अनिल पाटील म्हणाले की, “काँग्रेसचे अनेक आमदार, नेते, पदाधिकारी, माजी आमदार-खासदार अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या संपर्कात आहेत. येणाऱ्या काळात हे संपर्कात असलेले काँग्रेसचे आमदार आणि खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील”, असं अनिल पाटील म्हणाले.
“आमची सर्व दारं खुली आहेत, कोणत्याही नेत्याला आम्ही आहे त्या पद्धतीने मान सन्मान देऊ. जो नेता अजितदादा यांच्यासोबत काम करणार असेल त्याचं आम्ही घरी जाऊन स्वागत करू. आजही जे नेते इकडे तिकडे असतील किंवा संभ्रमावस्थेत असतील त्यांना हात जोडून विनंती की त्यांनी एक संघ व्हावं”, असंही अनिल पाटील म्हणाले.
“गल्लीपासून दिल्लीतील नेत्यापर्यंत आमचं आवाहन आहे. यामध्ये एकनाथ खडसे, देवकर, माजी मंत्री सतीश पाटील सुद्धा आहेत. यांना आवाहन नाही तर नम्र विनंती आहे. सर्वांनी अजित पवार यांच्यासोबत पक्ष संघटन करावं”, अशी विनंतीही अनिल पाटील यांनी यावेळी केली. ते पुढे म्हणाले की, “जे जे लोक आज अजित पवार यांच्यासोबत नसल्याचे दाखवत आहेत, त्यांचे आम्हाला मागून पुढून संपर्क चालू आहेत. त्यामुळे आमच्यासोबत जळगाव जिल्ह्यातील 100 टक्के कधी होतील याचा भरोसा नाही”, असा दावाही अनिल पाटील यांनी केला.
राष्ट्रवादीचे कार्यालय कोणाच्या ताब्यात जाणार?
“जे कार्यालय आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय आहे. राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वर बाबूजी जैन यांनी पक्षासाठी बांधून दिलं होत. काही काळाकरिता ते वापरायला दिलं होतं. त्याच कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांनी ईश्वर बाबूजी यांना प्रवेश करण्यास बंदी केली होती. या कार्यालयाचा जे जे नेते वापर करत असतील, ते बलाढ्य नेते आहेत, त्यांनी अनेक प्रकारे पद भूषवली आहेत. काही नेत्यांनी पदांचा वापर करून ते मोठ्या प्रमाणावर चर्चेत सुद्धा राहिले. असे काही नेते सुद्धा त्या कार्यालयावर आपला हक्क दाखवत आहेत”, असं अनिल पाटील म्हणाले.
“या नेत्यांनी आता ज्या ईश्वर बापुजींचं कार्यालय आहे त्या ईश्वर बाबूजींच्या कार्यालयात आपण न बसता स्वतःच्या बळावर नवीन कार्यालय उभं करावं आणि सामान्य कार्यकर्त्यांसाठी ते सोडावं. आम्ही आधीच मागणी केली आहे की त्यांन ईश्वर बापुजींचं कार्यालय सोडावं. त्या कार्यालयावर आमचाच दावा आहे. वेल्फेरेच्या नव्याने राष्ट्रवादीची जी कार्यालये असतील त्या कार्यालयाबाबत वेल्फेअरमधील सदस्य ठरवतील. ज्याला ते मिळतील त्यांनी त्याचा वापर करावा. महाराष्ट्रातील बरीच राष्ट्रवादीची कार्यालय ही वेल्फेअरच्या नावाने हस्तांतरित झालेले नाही यात जळगाव जिल्ह्याचे कार्यालय याचाही समावेश आहे. जळगावचे कार्यालय हे खाजगी व्यक्तीच्या नावाने आहे. आणि ईश्वर बाबूजी यांनी आशीर्वाद दिला तर राष्ट्रवादीचे आज जे कार्यालय आहे त्या कार्यालयावर आम्ही दावा ठोकणारच आहोत. त्यांनी हे कार्यालय ईश्वर बाबुजी यांना परत करावे. मग ते ठरवतील ते आम्हाला द्यायचं की कुणाला द्यायचं ते ठरवतील”, असंही अनिल पाटील म्हणाले.