मुंबई,दि.2: शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी TV9 शी बोलताना भाजपावर जोरदार टीका केली. आम्हाला महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती जपायची आहे. बोंबलणारे लोक बाहेरचे आहेत. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आणि सुधीर मुनगंटीवार हे मूळचे लोकं आहेत. त्यांना आम्ही उत्तर देऊ ना. हे हौशे गवशे, नाचे बाहेरून आले आणि भाजपचा झेंडा फडकवून आम्हाला दाखवत आहेत. त्यांना काय माहीत आहे भाजप?
आम्ही अटलजी, अडवाणी, मुरली मनोहर जोशींसोबत काम केलेले लोकं आहोत. आमचा भाजपशी जुना संबंध आहे. तुम्ही कधी आलात भाजपमध्ये? आयुष्यभर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसेच्या पखाली वाहिल्या. इकडून तिकडे करत असतात. तुम्ही भाजपबद्दल सांगू नका. आम्हाला भाजप आणि संघ काय हे सांगू नका. उद्या भाजपचं सरकार नसेल तेव्हा तुम्ही त्या पक्षात नसाल. उद्या केंद्रातील भाजपचं सरकार गेल्यावर यातील एकही जण भाजपमध्ये नसेल, असा दावाही त्यांनी केला.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे. यानंतरचा नंबर शिवसेनेचे अनिल परब यांचा आहे असे विरोधक म्हणत आहेत. विरोधकांच्या या विधानावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. माझ्याच भाषेत बोलायचं तर चुXX लोकं आहेत ते. चुXX…, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
संजय राऊत यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना हा संताप व्यक्त केला. माझ्या भाषेत बोलायचं झालं तर चुXX आहेत ते लोकं. चुXX … असा शब्द बाळासाहेबांनीही अनेकदा वापरला आहे. चुXXचा अर्थ मूर्ख असा आहे. तुम्ही कोण आहात? याला त्याला अटक करायला तुमच्या बापाची केंद्रीय तपास यंत्रणा आहे का? असा संतप्त सवाल करतानाच तुम्ही स्वत:ला सांभाळा. तुम्हाला कधी अटक होईल या तारखा आम्हालाही माहीत आहे. पण आम्ही या पातळीवर उतरायचे का? असा सवाल राऊत यांनी केला.
अनिल देशमुख स्वत:हून ईडीसमोर हजर झाले आहेत. आता ईडीची जबाबदारी आहे. जे तक्रारदार आहेत त्यांना ईडीने समोर आणावं. विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहूल चोक्सी असे बरेच लोक पळून गेले आहेत. त्यांना आणले का? हे सर्व लोक पळून जाण्यास केंद्र सरकार जबाबदार आहे. केंद्राच्या मदतीशिवाय ते पळून जाऊच शकत नाहीत, असा दावा राऊत यांनी केला.