पुणे,दि.4: Raj Thackeray On NCP: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. राज्यातील राजकीय परिस्थितीला शरद पवारच जबाबदार असल्याचे राज यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. अजित पवारांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या 8 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या घडामोडींनंतर राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावरच निशाणा साधत जुना इतिहास बाहेर काढला आहे. (Raj Thackeray On NCP)
काय म्हणाले राज ठाकरे? | Raj Thackeray On NCP
‘जे झालंय ते अत्यंत किळसवाणं आहे. महाराष्ट्रातल्या जनमताचा कानोसा घेतला तर प्रत्येक घरात शिव्या ऐकायला मिळतील. हा मतदारांचा घोर अपमान आहे. घड्याळाने काटा काढला की काट्याने घड्याळ काढलं काहीच समजत नाही. मात्र हे काही अचानक घडलेले नाही तर फार आधीपासून ठरत होतं अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
‘या सगळ्या गोष्टींची महाराष्ट्रात शरद पवारांनी सुरूवात केली. त्यांनी पहिला पुलोदचा प्रयोग केला 78 साली, तेव्हा काय केलं? त्याआधी महाराष्ट्रात असं कधी झालं नव्हतं. या सगळ्या गोष्टींची सुरूवात पवार साहेबांकडून झाली शेवटही पवार साहेबांकडून झाला’, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं.
‘बहुदा त्यांनीच हे पेरलं आहे. प्रफुल पटेल, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ हे अजित पवारांबरोबर जाणारी माणसं नाहीत. ही तीन माणसं मला संशयास्पद वाटतात, कारण अजित पवारांसोबत जाऊन मंत्रिपदं स्वीकारतील’, असा संशयही राज ठाकरे यांनी व्यक्त केला.
‘ही गोष्ट अचानक घडली असं नाही, हे कित्येक दिवस हे सुरू होतं. वातावरणामध्ये चालू होतं, काल ते दिसलं. अजित पवारांनी स्टेटमेंट केलं होतं, शरद पवारांचे फोटो सर्व होर्डिंगवर लावा. हे सगळं अनाकलनीय आहे. उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तर आश्चर्य वाटणार नाही’, अशी प्रतिक्रियाही राज ठाकरे यांनी दिली.
उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येण्याबाबतही राज ठाकरेंना विचारण्यात आलं तेव्हा आमच्या बैठकीत अशी कोणतीही मागणी झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.