मुंबई,दि.१९: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठं विधान केले आहे. ‘गद्दार दिवस’ हा निव्वळ राष्ट्रवादीकडून नाहीतर घराघरात साजरा केला जाणार आहे. हा एकच असा प्रसंग महाराष्ट्रात घडला आहे, जो लोकांच्या घराघरात गेला आहे. ‘पन्नास’ म्हटले की लगेचच लहान पोरगाही ‘खोके’ म्हणतो. उद्याचा ( २० जून ) दिवस हा ‘पन्नास खोक्यांचा दिवस’, ‘पलायन दिवस’ आणि ‘गद्दार दिवस’ आहे. त्यामुळे तो घराघरात वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठं विधान | Jitendra Awhad
“माझ्या अंदाजाने सहानुभूती उध्दव ठाकरे यांना मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातही उध्दव ठाकरे यांच्याबद्दल लिहिण्यात आले आहे. त्यावरुन साहजिकच महाविकास आघाडीचा प्रमुख चेहरा हा उध्दव ठाकरे असणार आहेत,” असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
“कोण कुठे जातंय हे महत्वाचे नाही. सर्वसामान्य शिवसैनिक हा कुणाबरोबर आहे, हे फार महत्त्वाचे आहे. १९९२ साली अशीच शिवसेना फुटली होती. जेव्हा फुटली त्यावेळी अशीच हालचाल होती. त्यानंतर फुटलेल्यांपैकी एकही माणूस महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पटावर दिसला नाही,” हेही आवर्जून जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
“इंदिरा गांधी यांचा इतिहास बघितला, तर १९७७ ते १९८० मध्ये जवळपास सगळेच त्यांना सोडून गेले होते. पण, त्या काळात काश्मीरचे गुलाम नबी आझाद वाशीममधून निवडून आले होते. त्यामुळे आमदार सोडून गेल्याने काही होत नसते. शेवटी जनता ठरवते काय करायचं ते, आमदारांच्या हातात काय नसते. उलट नवीन मुलांना संधी मिळते, त्यात काय वाईट आहे,” असा प्रतिसवालही जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांना केला.