मुंबई,दि.4: Asim Sarode: कायदेतज्ञाने मोठा दावा केला आहे. 11 मे नंतर नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. यानंतर राज्याच्या राजकारणात नेमकं काय घडणार याबाबत राजकीय तज्ज्ञही अनेक अंदाज वर्तवताना दिसत आहेत. अशातच आता कायदेतज्ञ असीम सरोदे यांच्या एका ट्विटने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी मोठा दावा केला आहे.
असीम सरोदे यांचा मोठा दावा | Asim Sarode
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी 10 मेच्या आधी नक्की होतील, असा दावा त्यांनी केला आहे. यासोबतच नवीन सरकार स्थापनेबाबतही त्यांनी मोठं विधान केलं आहे. 11 मे नंतर नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग येणार हे सुद्धा नक्की, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटलं आहे.
शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे. पवारांच्या राजीनाम्याचे पडसाद महाविकासआघाडीवरही उमटले आहेत. यादरम्यान काँग्रेस आणि ठाकरे गटातला सुसंवाद चांगलाच वाढला आहे.
दुसरीकडे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही नुकताच मोठा गौप्यस्फोट केला होता. राष्ट्रवादीचं भाजपसोबत बोलणं सुरू आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठका झाल्या आहेत. राष्ट्रवादीनंही याचं खंडन केलं नसल्याचा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या गौप्यस्फोटानंतर आता असीम सरोदे यांच्या या ट्विटनेही लक्ष वेधलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नेमकं काय घडतं? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.