मुंबई,दि.29: Rain Alert: हवामान खात्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यातील बहुतांश भागात पाऊस होत आहे. एप्रिलच्या सुरूवातीपासून वादळी पाऊस आणि गारपीट होत असल्याने राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता | Rain Alert
दरम्यान आज (दि. 29) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. विदर्भात वादळी वारे, जोरदार पाऊस, गारपिटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, मुंबईत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भाच्या विविध भागात सतत वादळी पाऊस आणि गारपीट होत असल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याने तेथील शेतकरी हवालदिल झाला आहे.
दरम्यान पुढचे दोन दिवस वादळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. विदर्भातील अकोला, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात गारपीट आणि जोरदार वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यासह, वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पावसाची हजेरी, ढगाळ हवामान यामुळे राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार होत आहे.
उन्हाचा चटका आणि उकाडा मात्र कायम आहे. राज्यात मागच्या 24 तासांत सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
कोकण वगळता राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 33 ते 38 अंशांच्या दरम्यान आहे. कमाल तापमानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.