मुंबई,दि.२३: Amol Kolhe Tweet: राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण आले आहे. शिरुरचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) भाजपात (BJP) जाणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या. या सगळ्या अफवा असल्याचं पुढे समोर आलं. तसेच अलिकडेच अमोल कोल्हे यांनी संसदेत केलेल्या भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कोल्हे यांचं संसदेत सर्वांसमोर कौतुक केलं. त्यानंतर पुन्हा एकदा अमोल कोल्हे भाजपात जाणार असल्याची चर्चा रंगू लागली. एका पत्रकार परिषदेत माध्यमांच्या प्रतिनिधींनी कोल्हे यांना यावर प्रश्नदेखील विचारला.
काय म्हणाले अमोल कोल्हे? | Amol Kolhe
तेव्हा अमोल कोल्हे पत्रकारांना म्हणाले की, “तुम्ही एखादी चांगली बातमी केली आणि दुसऱ्या वर्तमानपत्राच्या संपादकांनी तुमचं कौतुक केलं तर तुम्ही तिकडे जाणार आहात असं मी म्हटलं तर तुम्हाला चालेल का? “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं लोकसभेत कौतुक केलं ही अभिमानाचीच गोष्ट आहे. परंतु ही काही ऑफर नाही. दरम्यान, आता अमोल कोल्हे यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या एका फोटोमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
अमोल कोल्हेंच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण | Amol Kolhe Tweet
डॉ. अमोल कोल्हे सोशल मीडियावर खूप सक्रीय असतात. आज जागतिक पुस्तक दिनानिमित्त त्यांनी पुस्तकं वाचतानाचे दोन फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. यापैकी एक फोटो पाहून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अमोल कोल्हे यांनी जे दोन फोटो शेअर केले आहेत. त्यापैकी पहिल्या फोटोत ते ‘गोष्ट पैशापाण्याची’ आणि ‘खंडोबा’ ही दोन पुस्तकं वाचताना दिसत आहेत. दुसऱ्या फोटोत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांवरील ‘नेमकचि बोलणे’ आणि ‘दी न्यू बीजेपी’ ही पुस्तकं वाचताना दिसत आहेत.
अमोल कोल्हे हे ‘दी न्यू बीजेपी’ पुस्तक वाचत असल्यामुळे ते नव्या भाजपाची विचारधारा जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर एका भाजपा समर्थकाने कमेंट करून “भाजपात तुमचं स्वागत आहे” असं म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका युजरने कोल्हे यांना प्रश्न केला आहे की, “तुम्ही नेमकं काय सुचवू पाहताय?” तर अजून एका युजरने कमेंट केली आहे की, “आज घड्याळ, उद्या कमळ परवा………?, पुढील वाटचालसाठी शुभेच्छा”
तसेच या फोटोसह अमोल कोल्हे यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “विचारधारा कोणतीही असो, ती समजून घेण्यासाठी पुस्तकांसारखा चांगला गुरू कोण?”