नवी दिल्ली,दि.8: चिंताजनक | देशभरात सध्या कोरोना झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत कोविड-19 चे 6,155 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह, कोरोनाचा डेली पॉझिटिव्हिटी रेट 5.63 टक्क्यांवर पोहोचला आहे, तर विकली पॉझिटिव्हिटी रेट 3.47 टक्क्यांवर पोहोचला आहे. कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत मनसुख मांडविया यांनी कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य सज्जतेचा आणि राज्यांसह कोविड-19 लसीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
डॉ. मनसुख मांडविया म्हणाले की, केंद्र आणि राज्यांनी सहकार्याच्या भावनेने काम करण्याची गरज आहे. या बैठकीतून एक विशेष गोष्ट समोर आली ती म्हणजे मास्क अद्याप अनिवार्य केले गेले नाहीत आणि राज्यांना कोविड चाचणी आणि जीनोम सीक्वेंसिंगवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले गेले. या बैठकीत राज्यांना 10 आणि 11 एप्रिल रोजी सर्व आरोग्य केंद्रांवर मॉक ड्रिल घेण्यास सांगण्यात आले आहे. मॉक ड्रीलचा आढावा घेण्यासाठी केंद्राच्या वतीने राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना स्वत: रुग्णालयांना भेट देण्यास सांगण्यात आले.
देशभरात कोरोना रुग्ण संख्येत वाढ
देशाची राजधानी दिल्लीत आता कोरोना जीवघेणा ठरत आहे. दिल्ली सरकारचे सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात कोरोनाचे अनेक रुग्ण दाखल आहेत, या सर्वांना ऑक्सिजनची गरज आहे. यापैकी काही रुग्णांची प्रकृती गंभीर असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. दिल्ली एलएनजेपी रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ सुरेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण 11 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. यापैकी दोन रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. यासोबतच उर्वरित 9 रुग्णांना ऑक्सिजन देण्यात आला आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या सर्व रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत आहे.
चिंताजनक | दिल्ली, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये वाढता प्रादुर्भाव
राजधानी दिल्लीबद्दल बोलायचं झालं तर, शुक्रवारी येथे 24 तासांत कोरोनाच्या 733 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत कोरोना पॉझिटिव्ह दर 19.93 टक्के आहे. दुसरीकडे, शुक्रवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 926 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या राज्यात कोरोनाचे 4487 सक्रिय रुग्ण आहेत. शुक्रवारी मुंबईत कोरोनाचे 276 नवे सक्रिय रुग्ण आढळले आहेत. मात्र मुंबईत आजपर्यंत कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झालेला नाही.
आश्चर्यकारक बाब म्हणजे, भारतात आढळलेल्या कोरोना प्रकरणांपैकी 38 टक्के रुग्ण XBB.1.16 या नव्या व्हेरियंटची आहेत. जिनोम सिक्वेन्सिंगवर लक्ष ठेवणाऱ्या INSACOG नं गुरुवारी जारी केलेल्या बुलेटिनमध्ये म्हटलं आहे की, मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत घेतलेल्या नमुन्यांमध्ये ओमिक्रॉनचा XBB व्हेरियंट सर्वाधिक असल्याचं आढळून आलं आहे.