नांदेड,दि.३: Ashok Chavan On Sanjay Shirsat: माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी संजय शिरसाट यांच्याबाबत सूचक विधान केलं आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी काँग्रेस नेते आमदार अशोक चव्हाण यांच्या संदर्भात मोठा गौप्यस्फोट केला होता. आगामी लोकसभा निवडणुकीआधी अशोक चव्हाण भाजपात जातील, असा मोठा दावा शिरसाट यांनी केला. शिरसाट यांच्या दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
अशोक चव्हाण यांनी दिले स्पष्टीकरण | Ashok Chavan
संजय शिरसाट यांच्या दाव्यावर स्वत: अशोक चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. संजय शिरसाट यांच्या कोणत्याही वक्तव्याची दखल घ्यायला हवी, असं मला वाटत नाही. येत्या काळात संजय शिरसाट यांनाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेल्याशिवाय पर्याय नाही, असं विधान अशोक चव्हाण यांनी केलं आहे. ते नांदेड येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संजय शिरसाट हे भविष्यकार आहेत का? | Ashok Chavan On Sanjay Shirsat
संजय शिरसाट यांनी केलेल्या दाव्याबाबत विचारलं असता अशोक चव्हाण म्हणाले, “संजय शिरसाट हे भविष्यकार आहेत का? शिरसाटांच्या कुठल्याही वक्तव्याची फार दखल घ्यायला हवी, असं मला वाटत नाही. दुसरा मुद्दा असा की, त्यांना मंत्रिमंडळात घेतलं जात नाही, हे निश्चितच झालं आहे. या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होतच नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही, त्यामुळे त्यांच्याकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेल्याशिवाय पर्याय नाही. ते लवकरच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जातील.”
काय म्हणाले होते संजय शिरसाट?
“काँग्रेसमध्येच एकवाक्यता नाही. अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांचं जमत नाही. बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांचंही जमत नाही. त्यामुळे मला तरी असं वाटतं की, अनेक दिवसांच्या घडामोडीवरून अशोक चव्हाण लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपात जातील. कारण एवढ्या मोठ्या नेत्याला तिथं योग्य वागणूक मिळत नाही, असं एकंदर दिसत आहे,” असा दावा संजय शिरसाट यांनी केला होता.