Maharashtra-Politics: अजूनही काही बिघडलेलं नाही उद्धवजी, पुन्हा एकदा शांततेत विचार करा

0

मुंबई,दि.२३: Maharashtra-Politics: विधानसभा २०१९ निवडणुकीनंतर भाजपा व शिवसेना युती सरकार आले नाही. त्यावेळी शिवसेनेने राष्ट्रवादी व काँग्रेसबरोबर राज्यात सरकार स्थापन केले. अशक्य वाटणारी गोष्ट अस्तित्वात आली. महाविकास आघाडीचे सरकार आले. अडीच वर्षं हे सरकार सत्तेत राहिल्यानंतर शिवसेनेत बंडखोरी झाली आणि उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं. या राजकीय घडामोडींचे संदर्भ महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सातत्याने येत असतात. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये गुरुवारी त्याचेच पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी समोर बसलेल्या उद्धव ठाकरेंना सूचक सल्ला देतात सभागृहात एकच हशा पिकला!

पण झाडाला फळंच नाही आली त्या… | Maharashtra-Politics

विधानपरिषदेत बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी मागील सरकारच्या काळातील एका वृक्षारोपण योजनेविषयी बोलताना सांगितलं, “२०१६मध्ये या योजनेला सुरुवात केली, तेव्हा उद्घाटनाला राज्यातील सर्व प्रमुख पक्षांचे नेते आले होते. उद्धव ठाकरेही आले. शरद पवार स्वत: झाड लावायला गेले”, असं मुनगंटीवार म्हणाले. तेवढ्यात समोर बसलेल्या उद्धव ठाकरेंनी “पण झाडाला फळंच नाही आली त्या”, असा टोला लगावला.

Maharashtra-Political
उद्धव ठाकरे आणि सुधीर मुनगंटीवार

उद्धवजी मी अनेकदा तुम्हाला व्यक्तिगत भेटून सांगायचो की

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या टोल्यावर लागलीच मुनगंटीवारांनी सूचक टिप्पणी केली. “उद्धवजी, मी अनेकदा तुम्हाला व्यक्तिगत भेटून सांगायचो की झाडाला फळं येतील. पण तुम्ही झाडाशीच नातं तोडलं. आता त्याला काय करणार. मी व्यक्तिगत तुम्हाला येऊन सांगायचो की उद्धवजी, या झाडाला कोणतं खत पाहिजे. तुम्ही ते खत न देता दुसरंच खत दिलं. त्याच्यामुळे त्या झाडाला फळं कशी येतील? मी एकदा नाही, तीनदा विनंती केली होती”, असं मुनगंटीवार म्हणाले.

मुनगंटीवारांच्या या टिप्पणीवर उद्धव ठाकरेंनी निरमा पावडरचा उल्लेख करताच विरोधी बाकांवर हास्याची लकेर उमटली. “त्याच्याऐवजी निरमा पावडर टाकली तुम्ही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

निरमा पाकिटात खत आलं होतं

उद्धव ठाकरेंच्या खोचक टोल्यावर सुधीर मुनगंटीवारांनी प्रत्युत्तरादाखल उद्धव ठाकरेंना खोचक सल्ला दिला. “खतच होतं. पण ते निरमा पाकिटात आल्यामुळे तुमचा गैरसमज झाला. आणि तुम्ही ज्याच्यावर नाव दुसरं होतं आणि द्रव्य झाड जाळणारं होतं ते टाकलं. पण अजूनही काही बिघडलेलं नाही. उद्धवजी, पुन्हा एकदा शांततेत विचार करा झाड वाढवण्याचा”, असा सूचक सल्ला मुनगंटीवारांनी देताच सभागृहात चांगलाच हशा पिकला!


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here