नागपूर,दि.21: Sameer Wankhede News: आयआरएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर असताना अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानवर (Aryan Khan) कारवाई केल्यानंतर वानखेडे चर्चेत आले होते. राष्ट्रवादीचे नेते आमदार नवाब मलिक (Nawab Malik) यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
समीर वानखेडे पुन्हा चर्चेत | Sameer Wankhede News
सध्या करदाता सेवा महासंचालनालयात असलेले समीर वानखेडे पुन्हा चर्चेत आले आहेत. आयआरएस अधिकारी असलेले समीर वानखेडेंच्या राजकारणातल्या एण्ट्रीची चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समीर वानखेडे 2024 साली लोकसभा निवडणूक लढू शकतात. समीर वानखेडे यांनी नागपूरच्या संघ मुख्यालयात अनेक मोठ्या नेत्यांशी संपर्क केला आहे, त्यामुळे या चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजपच्या तिकीटावर समीर वानखेडे वाशिममधून निवडणूक लढतील, असं बोललं जातंय.
समीर वानखेडे यांना याबाबत विचारलं असता त्यांनी यावर काहीही बोलायला नकार दिला आहे. याआधी समीर वानखेडे यांनी अनेकवेळा वाशिमचा दौरा केला आहे. समीर वानखेडे हे मुळचे वाशिमचे आहेत. वाशिम दौऱ्यांवर आलेले असतानाही समीर वानखेडे यांना अनेकवेळा राजकीय पक्षात प्रवेश करण्याबाबत विचारण्यात आलं, पण त्यांनी कधीच अधिकृतरित्या काहीही उत्तर दिलं नाही.
समीर वानखेडे यांनी रविवारी नागपूरमध्ये आरएसएसच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली, त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समीर वानखेडे 2024 आधी भाजपमध्ये जाऊ शकतात आणि वाशिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढू शकतात.
शाहरुखच्या मुलाला केली अटक
एनसीबीचे झोनल डायरेक्टर असताना समीर वानखेडे सर्वाधिक चर्चेत आले होते. तेव्हा त्यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली होती. एवढच नाही तर समीर वानखेडे यांनी सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्सची अनेक प्रकरणं समोर आणली होती, ज्यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ माजली होती. एनसीबीचे झोनल डायरेक्टर असताना समीर वानखेडे यांनी ड्रग्सच्या रॅकेटवर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली, ज्यात दाऊदच्या माणसांना अटकही झाली.