मुंबई,दि.26: क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणावरून राष्ट्रवादीचे नेते मंत्री नबाब मलिक हे सुरुवातीपासून NCB च्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत आहेत. NCB चे समीर वानखेडे यांनी बोगस कारवाई केल्याचे मलिक यांनी यापूर्वीच आरोप केले आहेत. मुंबई ड्रग्स केसचा तपास करत असलेल्या एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्याविरोधात राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक हे कमालीचे आक्रमक झाले आहेत. या प्रकरणात ठरावीक वेळाने ते नवनवे गौप्यस्फोट करत आहेत. दरम्यान, आज दिवसाच्या सुरुवातीलाच नवाब मलिक यांनी अजून एक मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती दिली आहे. एनसीबीमधील स्पेशल २६ बाबत लवकरच माहिती देणार असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
नबाब मलिक यांनी या संदर्भात दोन ट्विट केली असून, त्यामध्ये ते म्हणतात की, एनसीबीच्या अधिकाऱ्याने पाठवलेले एक निनावी पत्र मला प्राप्त झाले आहे. यामधील माहिती लवकरच मी ट्विटच्या माध्यमातून प्रसिद्ध करणार आहे. एनसीबीमधील स्पेशल-२६ बाबत मी लवकरच उगलडा करणार आहे. नवाब मलिक यांनी केलेल्या या ट्विटमुळे आता या प्रकरणात ते कुठला नवा गौप्यस्फोट करणार आणि त्यामधून नेमकी कुठली माहिती समोर येणार याबाबत चर्चा रंगली आहे.
Good Morning everyone,
I am releasing soon…
'SPECIAL 26'— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 26, 2021
NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे मुस्लिम असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते मंत्री नबाब मलिक यांनी केला होता. त्यांचं खरं नाव समीर दाऊद वानखेडे आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा एक कथित जन्मदाखल्याचा फोटो ट्विट केला होता. त्या कथित जन्मदाखल्यामध्ये 14 डिसेंबर 1979 अशी तारीख दिसत असून समीर आणि मुस्लिम असं इंग्रजीत लिहिलेलं दिसतं आहे.
वानखेडे यांचा तरुण असतानाचा मुस्लिम पद्धतीने केलेल्या विवाहाचा फोटो ट्विट करत त्यावर पैचान कौन? असा सवाल नवाब मलिक यांनी केला होता. दुसऱ्या ट्विटमध्ये एक कागदही नवाब मलिक यांनी ट्विट केला होता. ट्विट करून ”यहाँ से शुरू होता है फर्जीवाडा” असं नवाब मलिकांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्याचदरम्यान समीर वानखेडे यांचा त्यांची पहिली पत्नी डॉ. शबाना कुरेशी यांच्या बरोबरचाही फोटो व्हायरल झाला आहे.