मुंबई,दि.7: रेल्वेत प्रवाशाला मारहाण केल्याप्रकरणी दोन तिकीट चेकरना (TTE) निलंबित करण्यात आले आहे. मारहाणीचा Video व्हायरल (Video Viral) झाला होता. बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये (Muzaffarpur) दोन ट्रेन तिकीट चेकरनी प्रवाशाला मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर रेल्वेने कारवाई केली आहे. प्रवाशाला बेदम मारहाण करणाऱ्या या दोन्ही टीटीईंना तात्काळ निलंबित करण्यात आलं असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं सीपीआरओने सांगितलं. दरम्यान दोन ट्रेन तिकीट चेकर प्रवाशाला लाथांनी मारत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
टीटीईंनी केली प्रवाशाला मारहाण
व्हायरल झालेला व्हिडीओ बिहारमधील मुजफ्फरपूरचा असल्याचं कळतं. या दोन टीटीईंनी ट्रेनमधील एका प्रवाशाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. टीटीईने प्रवाशाला ट्रेनच्या वरच्या सीटवरुन खाली खेचलं आणि नंतर त्याच्या चेहऱ्यावर आणि छातीवर अनेक वेळा लाथ मारली. ट्रेनमधील इतर प्रवासी आरडाओरडा करत राहिले मात्र दोन्ही टीटीईंनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत प्रवाशाला बेदम मारहाण केली.
मारहाणीत प्रवासी गंभीर जखमी
ट्रेनमध्ये बसलेले इतर प्रवासी तिकीट चेकरला मारहाण करण्यापासून अडवत होते, पण ते थांबले नाहीत. अखेर प्रवाशांनी मध्ये पडून टीटीईला मारहाण करण्यापासून रोखलं. तुम्हाला प्रवाशाला मारहाण करण्याचा कोणताही अधिकार नाही, असं टीटीई सांगितलं. दरम्यान या मारहाणीत प्रवासी गंभीर जखमी झाला. टीटीईचे हे कृत्य पाहून इतर प्रवासी संतप्त झाले आणि त्यांनी ट्रेनमध्ये गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यादरम्यान आरपीएफच्या पथकाने ट्रेन गाठली आणि जखमी प्रवाशाला बाहेर काढले. यादरम्यान एका प्रवाशाने या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ बनवला.
टीटीई तात्काळ निलंबित
तर दुसरीकडे हा टीटीईने प्रवाशाला केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने पाऊल उचललं. दोन्ही तिकीट चेकरला तात्काळ निलंबित केलं. तसंच त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असंही सांगितलं.